संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2022 20:44 IST2022-07-06T20:43:39+5:302022-07-06T20:44:15+5:30
Life Imprisonment : सत्र न्यायालयाचा निर्णय उच्च न्यायालयाने ठरवला योग्य

संशयावरून प्रेयसीची हत्या करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला जन्मठेपच
मुंबई : संशयावरून २० वर्षीय प्रेयसीची हत्या हॉटेलमध्ये केल्यानंतर तिथेच आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रियकराला सत्र न्यायालयाने ठोठावलेली जन्मठेपेची शिक्षा उच्च न्यायालयाने योग्य ठरविली.
‘मुलीच्या प्रियकराच्या हातून हत्येचे निघृण कृत्य’ असे म्हणत न्या. प्रसन्ना वराळे व न्या. श्रीकांत कुलकर्णी यांनी आरोपीची जन्मठेपेची शिक्षा कायम केली. मुलीच्या अंगावर १९ गंभीर जखमा पाहून त्याने पीडितेची हत्या करण्यासाठी कशाप्रकारे कट रचला होता, हे समजते, असे न्यायालयाने म्हटले. २७ जून रोजी न्यायालयाने निकाल दिला. मात्र, निकालाची प्रत बुधवारी उपलब्ध झाली.
आरोपीने (३०) त्याची प्रेयसी समांथा फर्नांडिस हिने विश्वासघात केल्याच्या संशयावरून २००८ मध्ये तिची हॉटेलमध्ये हत्या केली. त्यानंतर त्याने स्वत:ला जखमी करून व विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.
मे २०१२ मध्ये सत्र न्यायालयाने आरोपीला हत्या व आत्महत्याप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याने सत्र न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले. सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, २० मार्च २००८ रोजी आरोपी व पीडिता हे रबाळे येथील एका हॉटेलमध्ये बेशुद्धावस्थेत आढळले. पोलीस दोघांनाही घेऊन रुग्णालयात पोहचले. शरीरावर १९ जखमा असलेल्या समांथाला रुग्णालयाने मृत घोषित केले. आरोपी शुद्धीवर आल्यावर त्याला पोलिसांनी अटक केली.
आरोपीचा अपील फेटाळताना न्यायालयाने म्हटले की, सरकारी वकिलांनी सादर केलेले पुरावे स्पष्ट आहेत आणि परिस्थितीवरून आरोपी दोषी असल्याचे सिद्ध होते. तसचे पीडितेची हत्या करण्याचा आरोपीचा हेतू सिद्ध करण्यासाठीही समाधानकारक पुरावे आहेत, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले. आपल्या प्रेयसीवर तीन अज्ञात लोकांनी हल्ला केल्याचा आरोपीचा युक्तिवाद न्यायालयाने फेटाळला. ही खोटी कहाणी असल्याचे न्यायालयाने म्हटले.