"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 19:49 IST2025-07-02T19:42:51+5:302025-07-02T19:49:32+5:30
सोनम रघुवंशी हीचा भाऊ गोविंद याने एकदा तरी आपल्याला आपल्या बहिणीची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी केली आहे.

"एकदा तरी मला माझ्या बहिणीला भेटू द्या"; सोनम रघुवंशीच्या भावाची मागणी, म्हणाला...
राजा रघुवंशी हत्येप्रकरणी त्याची पत्नी सोनम रघुवंशी, तिचा प्रियकर राज कुशवाहा आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. मेघालय पोलिसांकडून या घटनेचा तपास देखील सुरू आहे. या तपासात सोनम रघुवंशी हिच्या कुटुंबाची देखील चौकशी केली जात आहे. या दरम्यान आता सोनम रघुवंशी हीचा भाऊ गोविंद याने एकदा तरी आपल्याला आपल्या बहिणीची भेट घेऊ द्यावी, अशी मागणी केली आहे. "बहिणीला भेटल्यावर तिला विचारेन की, ती अशी का वागली", असे देखील गोविंद म्हणाला.
राजा रघुवंशी हत्येमध्ये सोनम रघुवंशी हिचा हात असल्याचे समोर आल्यापासून तिचा भाऊ गोविंद याने आपल्या बहिणीला शिक्षा व्हावी, अशी मागणी केली होती. तर, त्याने आपण नेहमीच राजाच्या कुटुंबासोबत असू, असे देखील म्हटले होते. मात्र, आता गोविंद शिलाँगला जाणार असून, यावेळी सोनमला भेटून तिला या सगळ्याच जाब विचारणार आणि तिने राजाला का मारले, या प्रश्नाचे उत्तर तिच्याच तोंडून ऐकणार, असे गोविंद म्हणाला. या आधी दोघांची गाजीपूरमध्ये भेट झाली होती. मात्र, त्यावेळी गोविंदला तिच्याशी बोलता आले नव्हते.
राजाच्या कुटुंबाला परत केले सगळे दागिने
सोनम आणि राजा रघुवंशी यांच्या लग्नात एकूण १५ लाख रुपयांचे दागिने सोनमला तिच्या सासरहून भेट म्हणून मिळाले होते. सोनमला देण्यात आलेले हे सगळे दागिने आता राजा रघुवंशी याच्या कुटुंबाला परत केले असल्याची माहिती गोविंद याने दिली. दुसरीकडे, संतप्त झालेल्या राजाच्या कुटुंबाने त्यांना सोनमचं जिवंतपणीच श्राद्ध घालण्यास सांगितलं होतं. यावर गोविंद म्हणाला की, सोनम आता त्यांच्या घराची सून आहे, जर त्यांनी सुनेचं श्राद्ध घातलं तर आम्ही त्यांच्यासोबतच असू.
पोलिसांच्या तपासाला वेग
राजा रघुवंशी हत्याप्रकरणाचा तपास पोलीस अतिशय जलद गतीने करत आहेत. पोलिसांनी आरोपींना अटक केली असून, हत्येसाठी वापरण्यात आलेले शस्त्र देखील जप्त केले आहे. दुसरीकडे, सोनम आणि राजा यांच्या कुटुंबांची चौकशी देखील करण्यात आली आहे. आता पोलिसांनी सोनमचे दागिने, तिचा लॅपटॉप आणि राजाला मारण्यासाठी आणलेली बंदूक देखील शोधून काढली आहे. यावरून आता तपासाला वेगळी दिशा मिळणार आहे.