Fake Money Crime: दररोजच्या कामात एआयचा वापर हळूहळू वाढू लागला आहे. नवीन कौशल्ये आत्मसात करण्यासाठी हे नव तंत्रज्ञान महत्त्वाचं ठरू लागलं आहे. पण, कोण याचा कशासाठी वापर करेल याचा नेम नाही. चॅटजीपीटीचा गैरवापर करणाऱ्या एका रॅकेटचा पोलिसांनी पर्दाफाश केला. त्यांनी चॅटजीपीटीकडून बनावट नोटा कशा बनवायच्या याचे धडे घेतले आणि त्या तयार केल्या. इतकंच काय तर त्यांनी त्या व्यवहारात वापरल्या देखील.
राजस्थानातील चित्तोडगढमध्ये ही घटना घडली आहे. शहरातील त्रिपोलिया चौकात पोलिसांनी तीन तरुणांची झाडाझडती घेतली. त्यावेळी त्यांच्याकडे ५०० रुपयांच्या ३० नोटा सापडल्या.
पोलिसांनी १५००० नोटा केल्या जप्त
पोलिसांनी व्यवस्थित तपासणी केल्यानंतर त्या नोटा बनावट असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी त्यांची चौकशी केल्यानंतर तयार केलेल्या ५०० रुपयांच्या नोटांपैकी ५ नोटा त्यांनी बाजारात वापरल्याचेही समोर आले. पोलिसांनी त्यांच्याकडून १५ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या.
पोलीस पोहोचले बनावट नोटा बनवणाऱ्या मास्टरमाईंडपर्यंत
पोलिसांनी त्यांची चौकशी केली. त्यावेळी या नोटा बनवणारा मास्टरमाईंड झालावाडचा आसिफ असल्याची माहिती मिळाली. त्याच्यासोबत आदिल आणि शाहनवाजही यात सहभागी असल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
आरोपींनी पोलिसांना सांगितले की, बनावट नोटा कशा तयार करायच्या हे चॅटजीपीटीकडून शिकले. नंतर त्यांनी सारोला गावात एक खोली भाड्याने घेतली. नोटा छपाईचे एक मशीनही खरेदी केले आणि तिथेच त्यांनी बनावट नोटा तयार करण्यास सुरुवात केली.
नोटा तयार करणाऱ्या खोलीवर पोलिसांचा छापा
पोलिसांनी नंतर ज्या खोलीमध्ये नोटा बनवण्याचे काम सुरू होते, तिथे छापा टाकला. तिथे प्रिंटर, नोटा बनवण्यासाठी लागणारा उच्च दर्जाचा पेपर, शाई, रसायने, हिरवी टेप, वॉटरमार्क तयार करण्यासाठी लागणारा लाकडी साचा जप्त केला.
आरोपी बनावट नोटा तयार करायचे आणि स्थानिक बाजारपेठेतील फेरीवाले, भाजी विक्रेते आणि ज्येष्ठ नागरिकांसोबत व्यवहार करून बनावट ५०० रुपयाच्या नोटा त्यांना द्यायचे. जिथे त्यांची ओळख होती अशा ठिकाणी ते या नोटांचा वापर करत नव्हते. दुसऱ्या भागात जाण्यासाठी ते बनवाट नंबर प्लेट असलेल्या दुचाकी वापरायचे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्तोडगढमध्येही त्यांनी एक खोली भाड्याने घेतलेली होती.