लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2025 13:32 IST2025-08-17T13:32:10+5:302025-08-17T13:32:58+5:30
Elvish Yadav Firing news: बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी घराजवळ थांबून सुमारे १० ते १२ गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारावेळी एल्विश घरात नव्हता, परंतू घरात त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक उपस्थित होते.

लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
यूट्यूबर आणि बिग बॉस विजेता एल्विश यादव याच्या गुरुग्राममधील घराबाहेर रविवारी (१७ ऑगस्ट) पहाटे गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबाराची जबाबदारी भाऊ गँगने घेतली असून सुमारे डझनभर गोळ्या त्याच्या घरावर झाडण्यात आल्या आहेत. याचे कारणही भाऊ गँगने सांगितले आहे.
बाइकवरून आलेल्या तीन अज्ञात लोकांनी घराजवळ थांबून सुमारे १० ते १२ गोळ्या झाडल्या होत्या. गोळीबारावेळी एल्विश घरात नव्हता, परंतू घरात त्याचा एक कर्मचारी आणि इतर काही लोक उपस्थित होते. पोलिसांनी CCTV फुटेजवरून गुन्हेगारांचा माग काढण्यास सुरुवात केली आहे. आरोपींनी हेल्मेट घातलेले होते. यामुळे ओळख पटवणे कठीण झाले आहे.
एल्विश यादवच्या गुरुग्राममधील घरावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला त्याची जबाबबारी नीरज फरीदपूर आणि भाऊ रीतुलिया या गुंडांनी घेतली आहे. नीरज आणि भाऊ दोघेही गँगस्टर हिमांशू भाऊ टोळीशी संबंधित आहेत. या गँगला भाऊ गँग म्हणून ओळखले जाते. एल्विश यादवने एका बेटिंग अॅपची जाहिरात केली आहे. या बेटिंग अॅपने अनेक घरे उद्ध्वस्त केली आहेत. एल्विश यादव अशा अॅपची जाहिरात करत आहे. म्हणूनच त्याच्या घरी गोळीबार करण्यात आला आहे, असे या भाऊ गँगने सोशल मीडियावरील पोस्टवर म्हटले आहे.
हिमांशू भाऊ कोण आहे?
पोर्तुगालमध्ये राहणारा गुंड हिमांशू भाऊ भारतात ३० हून अधिक गुन्हेगारी आणि संघटित गुन्ह्यांमध्ये हवा आहे. हिमांशू भाऊचा गुन्हेगारी प्रवास १७ वर्षांचा होता. तो खून, खंडणी आणि हत्येचा प्रयत्न यासारख्या विविध गुन्ह्यांमध्ये सहभागी होता. तो बनावट पासपोर्टवर भारतातून दुबईला पळून गेला आणि नंतर पोर्तुगालला स्थलांतरित झाला आहे.