नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2025 09:55 IST2025-09-26T09:55:31+5:302025-09-26T09:55:56+5:30
२४ दिवसांत शहरात मध्यवर्ती भागात चार खुन पाथर्डी, सातपरमध्ये भयावह वातावरण, एकापाठोपाठ गन्हेगारी घटनांमुळे परिसर हादरला

नाशिक हादरलं! कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे अन् सुरक्षेचे १२ वाजवून १२ तासांत दोन खून
सातपूर - सात महिन्यांपूर्वी सटाणा येथील कंधाणे येथून कामधंदा करण्यासाठी सातपूरला आलेल्या जगदीश परशराम वानखेडे (२३, रा. श्रमिकनगर) याला जीव गमवावा लागला आहे. काही टवाळखोरांनी बुधवारी (दि.२४) रात्री त्याला रस्त्यात अडवून कुरापत काढत धारदार शस्त्राने वार करत खून केला. सातपूरकरांचा दिवस उगविला तो या कामगाराच्या खुनाच्या बातमीनेच. सातपूर पोलिसांनी संशयित आरोपी आदित्य यादव (२१) याच्यासह दहा संशयित हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.
बुधवारी जगदीश हा त्याचा मित्र मयूर निकम याच्यासोबत दुचाकीने रात्री ११ वाजेच्या सुमारास घराकडे जात होता. यावेळी रस्त्यात त्यांना काही टवाळखोरांच्या टोळीने रोखले. कुठलेही एक कारण नसताना कुरापत काढत जगदीशच्या कानशिलात लगावली. गाडी नीट चालवता येत नाही का? असे म्हणत जाब विचारण्यास सुरुवात केली. यावेळी त्यांच्यात शाब्दिक वाद झाले. टोळक्याने खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली आणि शस्त्रे काढून जगदीशच्या छातीवर आणि पाठीत सपासप वार केले. त्यामुळे तो रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. मयूर व त्याचा दुसरा मित्र अजय याने काही नागरिकांच्या मदतीने जखमी अवस्थेत जगदीश यास शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. काही वेळेतच वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास तपासून मृत घोषित केले.
भरदिवसा कॅफेमध्ये यवकाला भोसकले
दुसरीकडे पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका कॅफेमध्ये बसलेल्या युवकावर गुरुवारी (दि. २५) पूर्ववैमनस्यातून चॉपर, कोयत्यांनी सपासप वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना भरदिवसा घडली. या हल्ल्यात राशिद हारुन खान (२२, रा. अंबड लिंक रोड, खाडी) असे मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. घटना घडताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मृताच्या नातेवाइकांसह परिसरातील नागरिकांची गर्दी जमल्याने दंगल नियंत्रण पथकाला पाचारण करण्यात आले होते.
अंबड लिंक रोडवर असलेल्या दत्तनगर व खाडीच्या भागात राहणाऱ्या राशिद याच्यासोबत त्याच भागातील 'गॅस गैंग'मधील टोळक्याने काही महिन्यांपूर्वी वाद घातला होता. तेव्हाही अंबड पोलिसांकडे तक्रार दिली होती. तेव्हाही पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात आली नाही, असा आरोप मृताच्या नातेवाइकांनी केला आहे. दरम्यान, पाथर्डी फाट्याकडे जाणाऱ्या रस्त्यावरील निसर्ग कॉलनी परिसरात असलेल्या एका कॅफेमध्ये राशिद हा त्याच्या मैत्रिणीने बोलविल्यामुळे चहा पिण्यासाठी थांबला होता. यावेळी त्या युवतीने मारेकऱ्यांना तो आल्याबाबतची माहिती दिली, असे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोरांनी तेथे येऊन चॉपर, कोयत्याने राशिदवर वार केले.
शहरात आतापर्यंत ३७ खून
आतापर्यंत शहरात ३७ खून झाले आहेत. चालू महिन्याच्या पहिल्या आठवड्यात गणेशोत्सव काळात बारा तासात सरकारवाडा पोलिस ठाणे हद्दीत दोन खून झाले होते. त्याचीच पुनरावृत्ती २० दिवसांनी गुरुवारी नवरात्रोत्सवात झाली.