चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची चॅटिंग पकडली; छळामुळे लातूरमध्ये विवाहितेचा संतापजनक शेवट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:59 IST2025-12-17T15:58:40+5:302025-12-17T15:59:27+5:30
लातूरमध्ये पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीची चॅटिंग पकडली; छळामुळे लातूरमध्ये विवाहितेचा संतापजनक शेवट
Latur Crime: स्वतःचे अफेअर लपण्यासाठी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणाऱ्या पतीच्या जाचाला कंटाळून एका २४ वर्षीय नवविवाहितेने मृत्यूला कवटाळले. लातूरजवळील वरवंटी शिवारात ही हृदयद्रावक घटना घडली. आरती रामेश्वर उरगुंडे असे मृत विवाहितेचे नाव असून, पतीचे दुसऱ्या महिलेसोबतचे प्रेमसंबंध उघड झाल्यानंतर झालेल्या वादातून तिने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
आरती आणि रामेश्वर यांचा विवाह ७ मे २०२३ रोजी झाला होता. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या आरतीच्या आयुष्यात लग्नाच्या एका वर्षानंतरच वादळ आले. पती रामेश्वर हा तिच्या चारित्र्यावर विनाकारण संशय घेऊ लागला होता. या संशयातून तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला जात असे. इतकेच नाही तर, सासरच्या घरी साध्या वस्तूंची मागणी केली तरी तिला माहेरून घेऊन ये म्हणत हिणवले जात होते.
असे उघड झाले पतीचे अफेअर
शुक्रवारी आरतीच्या हाती पती रामेश्वरचा मोबाईल लागला आणि तिच्या पायाखालची जमीनच सरकली. पती दुसऱ्या एका महिलेसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग करत असल्याचे तिला दिसले. जेव्हा तिने याबद्दल जाब विचारला, तेव्हा रामेश्वरने आपली चूक मान्य करण्याऐवजी उलट तिलाच मारहाण केली आणि "तुला जे करायचे ते करून घे" असे म्हटले.
कुऱ्हाडीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न; पण वेळ निघून गेली होती...
मारहाणीनंतर घाबरलेल्या आरतीने आपल्या वडिलांना, राजेंद्र दरेकर यांना फोन करून सर्व हकीगत सांगितली. वडील मुलीच्या घरी आले, त्यांनी दोघांची समजूत काढली आणि ते घराबाहेर पडले. मात्र, वडील गेल्यानंतर काही मिनिटांतच रामेश्वरने पुन्हा मारहाण सुरू केली. यावेळी वडिलांना पुन्हा फोन केल्यानंतर ते तातडीने मुलीच्या घरी परतले.
वडिलांनी पाहिले तेव्हा दृश्य अत्यंत भयानक होते. आरतीने स्वतःला खोलीत कोंडून घेतले होते, तर तिचा पती रामेश्वर कुऱ्हाडीने दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत होता. वडिलांनी खिडकीच्या फटीतून पाहिले असता आरतीने पंख्याला गळफास घेतल्याचे दिसले. दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तोपर्यंत आरतीचा प्राण गेला होता.
पोलीस कारवाई आणि गुन्हा दाखल
याप्रकरणी मयत आरतीचे वडील राजेंद्र दरेकर यांच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये पती रामेश्वर उरगुंडे आणि सासरे सिद्धेश्वर उरगुंडे यांच्या विरोधात एफआयआर नोंदवण्यात आला असून पोलिसांनी आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
नळेगाव तलावातही दोन मृतदेह; लातूर हादरले
लातूरच्या चाकूर तालुक्यातील नळेगाव येथील गणपती विसर्जन पॉईंटवर एका महिला आणि पुरुषाचा मृतदेह तरंगताना आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत पुरुष वीटभट्टी कामगार होता, तर महिला घरकाम करत होती. हा प्रकार प्रेमप्रकरणातून घडलेली आत्महत्या असावा, अशी प्राथमिक चर्चा परिसरात सुरू आहे. पोलीस या प्रकरणाचाही अधिक तपास करत आहेत.