गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2024 18:57 IST2024-02-04T18:56:29+5:302024-02-04T18:57:00+5:30
जमीन मालकाशी वादामुळे दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांच्यात तिढा सोडविण्याची चर्चा सुरु होती. सध्या गायकवाडांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गणपत गायकवाडांवर जमीन मालकाने दाखल केला अॅट्रॉसिटी; अडचणी आणखी वाढल्या
जमिनीच्या वादातून पोलीस ठाण्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर गोळीबार करणाऱ्या भाजपचे आमदारा गणपत गायकवाड यांच्या अडचणींत वाढ झाली आहे. जमीन मालकाला जातीवाचक शिवीगाळ केल्यावरून गायकवाडांसह आठ जणांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
द्वारली गावातील जमीन मालकाला जातीवाचक शब्द वापरल्याने गायकवाड यांच्यासह आठ जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जागेच्या वादातून आमदार गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख महेश गायकवाड आणि त्यांचे सहकारी राहुल पाटील यांच्यावर पोलीस ठाण्यात गोळीबार केला होता. समोरासमोर बसलेले असताना अचानक गणपत गायकवाड यांनी उठून हा गोळीबार सुरु केला होता. याचे सीसीटीव्ही फुटेज प्रसारमाध्यमांसमोर आले आहे.
दरम्यान ३१ जानेवारीला गणपत गायकवाड आणि द्वारली गावातील जमीन मालक मधुमती एकनाथ जाधव व त्यांच्यासोबत असलेल्या महिलांना जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला होता. तसेच तुमची जमीन घेतल्याशिवाय तुम्हाला सोडणार नाही, अशी धमकीही गायकवाड व त्यांच्या सात साथीदारांनी दिली होती, असा आरोप या महिलांनी केला आहे. यावरून पोलिसांनी गायकवाड यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे.
गायकवाड यांच्यासह जितेंद्र पारीख, विठ्ठल चिकणकर, शिवाजी फुलोरे, सौरभ सिंग, छोटू खान, चंद्रकात ओल, मंगेश वारघेट यांच्या विरोधात हिललाईन पोलिस ठाण्यात ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. याच वादामुळे दोन्ही गट पोलीस ठाण्यात गेले होते. तिथे त्यांच्यात तिढा सोडविण्याची चर्चा सुरु होती. सध्या गायकवाडांना १४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.