lakhs rupees diamond necklace stolen in kolkata and arrested in mumbai | कोलकात्यात लाखोंचा हिऱ्याचा हार केला लंपास अन् मुंबईत पडल्या बेड्या  
कोलकात्यात लाखोंचा हिऱ्याचा हार केला लंपास अन् मुंबईत पडल्या बेड्या  

ठळक मुद्दे मागील चार महिने परागंदा होऊन मुंबईत लपलेल्या चोरट्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष - १२ ने बेड्या ठोकल्या आहेत. दागिन्यांचा अपहार केल्याने त्याच्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत.

मुंबई - कोलकात्यात गिरीश पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत ५७ लाखांच्या हिऱ्याचा नेकलेस चोरून मागील चार महिने परागंदा होऊन मुंबईत लपलेल्या चोरट्यास मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष - १२ ने बेड्या ठोकल्या आहेत. या आरोपीला कोलकत्ता पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. 

मागील चार महिन्यांपासून कोलकाता येथून परागंदा झालेला चोर मुंबई शहरात येऊन स्वतःची ओळख लववून वावरत असल्याची खात्रीलायक माहिती शाखेच्या कक्ष - १२ ला मिळाली होती. याबाबत वरिष्ठांना माहिती देऊन त्यांचे मार्गदर्शन घेऊन कक्ष - १२ च्या पथकाने आरोपीचा माग काढत आणि त्यांच्या खबऱ्यांचे व तांत्रिक तपासाच्या आधारे शोध घेण्यात आला. १३ नोव्हेंबरला गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी हा अंधेरी येथील सिप्झ येथे येणार असल्याने सापळा रचून शिताफीने आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या चौकशी केली असता त्याने गिरीश पार्क पोलीस ठाण्याच्या हद्दीत  हिऱ्याचा नेकलेस चोरल्याचे कबूल केले. या आरोपीविरोधात कोलकाता येथील स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये गहाण ठेवलेली त्याची स्वतःचे घर २६ लाख ६५ हजारांना परस्पर विकून फसवणूक केल्याप्रकरणी कोलकाता येथील एअर पोर्ट पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद आहे. 

हा आरोपी सोन्याचे दागिने घडविणारा असून त्याने त्याला ज्वेलर्स दुकानदार आणि अन्य लोकांकडून प्राप्त झालेल्या ऑर्डरमधील सोन्यांच्या दागिन्यांचा अपहार केल्याने त्याच्याविरोधात पश्चिम बंगालमध्ये अनेक गुन्हे दाखल आहेत. आरोपीला पुढील कारवाईसाठी कोलकाता पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 

Web Title: lakhs rupees diamond necklace stolen in kolkata and arrested in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.