सीसीटीव्ही बंद, कर्जाचं ओझं आणि हत्या... तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 13:20 IST2025-02-24T13:18:53+5:302025-02-24T13:20:28+5:30
एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे.

सीसीटीव्ही बंद, कर्जाचं ओझं आणि हत्या... तिहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांचा धक्कादायक खुलासा
पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एकाच कुटुंबातील तीन सदस्यांच्या गूढ मृत्यूप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. या प्रकरणाच्या पोलीस तपासात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. मृतांमध्ये रोमी दे आणि सुदेशना दे या दोन महिला आणि एका १४ वर्षीय अल्पवयीन मुलाचा समावेश आहे. त्याची हत्या एकाच कुटुंबातील दोन भावांनी, प्रसुन दे आणि प्रणय दे यांनी केल्याचा पोलिसांना संशय आहे. हे लक्षात घेण्यासारखं आहे की, दोन्ही भाऊ सध्या रुग्णालयात दाखल आहेत. रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर, पोलीस त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करू शकतात. कर्जाच्या ओझ्यामुळे भावांनी ही हत्या केल्याचा पोलिसांना संशय आहे.
१९ फेब्रुवारी रोजी सकाळी कोलकात्यातील टांगरा परिसरात एका अपघाताची माहिती वाहतूक पोलिसांना मिळाली. माहितीच्या आधारे जेव्हा पोलीस प्रसून आणि प्रणयच्या घरी पोहोचले तेव्हा तेथील दृश्य पाहून सर्वांनाच मोठा धक्का बसला. रोमी दे, सुदेशना दे आणि एका अल्पवयीन मुलीचे मृतदेह घरात पडले होते. सुरुवातीच्या तपासात ही आत्महत्या असल्याचं मानलं गेलं होतं, परंतु पोस्टमॉर्टम रिपोर्टने हा दावा फेटाळून लावला. अहवालानुसार, तिघांचीही हत्या करण्यात आली होती.
गाडीचा भयानक अपघात
पोलीस सूत्रांनी सांगितलं की, प्रसून आणि प्रणय हे सख्खे भाऊ आहेत, त्यांनी सर्वप्रथम त्यांच्या पत्नी आणि प्रसूनच्या मुलीची हत्या केली आणि नंतर आत्महत्या करण्याचा विचार केला. यासाठी दोघेही एका गाडीने बाहेर पडले, पण त्यांच्या गाडीला एक भयानक अपघात झाला. या अपघातात दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाले आणि त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. या कारणास्तव त्यांचा आत्महत्येचा प्लॅन फसला.
कर्जाचं ओझं हे मुख्य कारण
पोलीस तपासात असं दिसून आलं की, हे कुटुंब चामड्याच्या वस्तूंचा व्यवसाय करत होते आणि त्यांच्यावर खूप कर्ज होते. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाची रक्कम इतकी मोठी होती की, कुटुंबाला ती परतफेड करणं अशक्य झालं होतं. तरीही, प्रसून आणि प्रणय यांनी त्यांची आलिशान लाईफस्टाईल कमी केली नाही. महागडे कपडे, आलिशान गाड्या ही त्याची सवय झाली होती. कुटुंबाच्या जवळच्या लोकांच्या चौकशीत असंही दिसून आलं की कर्ज वाढत असतानाही, दोन्ही भावांनी त्यांच्या खर्चावर लगाम लावला नाही, ज्यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती आणखी बिकट झाली. या भयानक घटनेमागे कर्जाचं ओझं हे मुख्य कारण असल्याचा पोलिसांचा दावा आहे.
सीसीटीव्ही कॅमेरे बंद
तपासादरम्यान आणखी एक महत्त्वाचा पुरावा समोर आला. ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी घरात बसवलेले सर्व सीसीटीव्ही कॅमेरे बंद होते. पोलिसांचं म्हणणं आहे की, हा योगायोग असू शकत नाही. त्यामुळे असं दिसतं की ही हत्या आधीच नियोजित होती आणि पुरावे नष्ट करण्यासाठी कॅमेरे जाणूनबुजून बंद करण्यात आले होते. याच कारणाने भावांवरील संशय आणखी वाढला.