लोअर परळ, दादर परिसरात २४ तासात चाकू हल्ल्याच्या घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 20:46 IST2018-12-18T20:44:08+5:302018-12-18T20:46:02+5:30
लोअर परळ आणि दादर परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

लोअर परळ, दादर परिसरात २४ तासात चाकू हल्ल्याच्या घटना
मुंबई - शहरात गेल्या २४ तासात दोन वेगवेगळ्या घटनात दोन तरुणांना चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याची घटना घडल्याने खळबळ माजली आहे. लोअर परळ आणि दादर परिसरात घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये घबराहट निर्माण झाली असून याचा अधिक तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.
याप्रकरणी ना. म. जोशी मार्ग आणि शिवाजी पार्क पोलिसांनी हत्येचा प्रयत्नासह गंभीर दुखापतीच्या गुन्ह्यांची नोंद केली आहे. दादर येथे पाण्याचा टँकर रस्त्याच्या बाजूला लावला म्हणून राम अशोक निशाद या २१ वर्षांच्या तरुणावर टॅक्सी चालकाने चाकूने हल्ला केला. राम हा प्रभादेवी येथे राहतो. सायंकाळी साडेचार वाजता त्याने त्याच्या ताब्यातील पाण्याचा टँकर रानडे रोडवरील बबन प्रभू चौकाजवळ लावला होता. याच कारणावरुन एका टॅक्सी चालकाने त्याच्यावर चाकूने प्राणघातक हल्ला केला. त्याला शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली होती. चाकू हल्ल्यात राम हा गंभीररित्या जखमी झाल्याने त्याला तातडीने केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्ल्यानंतर टॅक्सी चालक पळून गेला असून याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
तर दुसरी घटना लोअर परळ परिसरात घडली. अमोल नागोजी बेलुसे हा २४ वर्षांचा तरुण अथर्व इमारतीत सहाव्या मजल्यावर राहतो. रात्री अडीच वाजता तो त्याच्या मित्रांसोबत इमारतीच्या गेटसमोरच बसला होता. यावेळी तिथे तीन तरुण आले आणि त्यांनी जुन्या वादातून मित्रांना जिवे मारण्याची धमकी देत अमोलवर चाकूने वार केले होते. या हल्ल्यात त्याच्या दंडाला आणि पाठीला गंभीर दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही माहिती मिळताच ना. म. जोशी मार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. याप्रकरणी तिन्ही आरोपी तरुणांविरुद्ध पोलिसांनी हत्येचा प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. तिन्ही आरोपी अमोलच्या ओळखीतले असून त्यांच्यात पूर्वीचा वाद होता. याच वादातून हा हल्ला झाल्याचे पोलिसांनी सांगितले.