१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2025 15:33 IST2025-11-07T15:31:56+5:302025-11-07T15:33:15+5:30
रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या एका पॅलिएटिव्ह केअर नर्सने १० रुग्णांची हत्या केल्याचे उघड झाले आहे.

AI Generated Image
जर्मनीतून एक मन सुन्न करणारी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. रुग्णांची सेवा करण्याचे व्रत घेतलेल्या एका पॅलिएटिव्ह केअर नर्सने चक्क आपले रात्रीचे काम कमी करण्यासाठी १० रुग्णांची हत्या केल्याचे उघड झाले आहे. ४४ वर्षीय या नर्सला न्यायालयाने १० रुग्णांच्या हत्येप्रकरणी आणि २७ जणांच्या हत्येच्या प्रयत्नाप्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने या गुन्ह्याला 'अत्यंत क्रूरता' दर्शवणारा ठरवत, तिच्या लवकर सुटकेची शक्यताही फेटाळून लावली आहे.
काम टाळण्यासाठी दिले विषारी इंजेक्शन्स
जर्मनीच्या वुर्सेलन शहरातील एका रुग्णालयात डिसेंबर २०२३ ते मे २०२४ या काळात ही भयानक घटना घडली. न्यायालयाच्या नोंदीनुसार, ४४ वर्षीय नर्सने तिच्या रात्रीच्या ड्युटीदरम्यान कामाचा भार कमी करण्यासाठी ही क्रूरता दाखवली.
नेमके काय केले?
नर्सने मॉर्फिन आणि मिडाजोलमसारख्या औषधांची जास्त मात्रा गंभीररीत्या आजारी आणि वृद्ध रुग्णांना दिली. सरकारी वकिलांनी सांगितले की, जास्त काळजी घेण्याची गरज असलेल्या रुग्णांची रात्रभर सेवा करावी लागू नये, म्हणून तिने त्यांना मारले. अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही नर्स अशा रुग्णांवर चिडचिड करत असे ज्यांना जास्त काळजीची गरज होती. न्यायालयाने म्हटले की, तिचे गुन्हे अत्यंत क्रूरता आणि गुन्ह्याची खोली दर्शवतात, त्यामुळे तिला १५ वर्षांनंतरही लवकर सोडले जाणार नाही.
कशी पकडली गेली नर्स?
ही आरोपी नर्स २०२० पासून रुग्णालयात कार्यरत होती आणि तिने २००७ मध्ये नर्सिंगचे प्रशिक्षण पूर्ण केले होते. तिच्या रात्रीच्या ड्युटीदरम्यान रुग्णांची अचानक तब्येत बिघडण्याच्या घटना वाढल्याचे डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांच्या लक्षात आले आणि त्यानंतर २०२४ मध्ये तिला अटक करण्यात आली.
सरकारी वकिलांनी सांगितले की, या नर्सने आणखी रुग्णांना नुकसान पोहोचवले आहे का, हे तपासण्यासाठी अनेक मृतदेह पुन्हा खणून काढले जात आहेत. नवीन पुरावे मिळाल्यास तिच्यावर आणखी खटले चालवले जाऊ शकतात. दोषी नर्सला या निर्णयाविरुद्ध अपील करण्याचा अधिकार आहे.