अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; रात्री जंगलात सोडून केले पलायन
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 20:40 IST2020-10-20T20:39:26+5:302020-10-20T20:40:31+5:30
Kidnapping : १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अमोल याने पीडित मुलीला पळवून नेले होते.

अल्पवयीन मुलीस फूस लावून पळविले; रात्री जंगलात सोडून केले पलायन
जळगाव : अल्पवयीन तरुणीला फूस लावून पळवून नेत तिला रात्रभर जंगलात सोडून पलायन केल्याप्रकरणी अमोल चंदन सोनवणे (२३, रा.मोहाडी, ता.जळगाव) याला एमआयडीसी पोलिसांनी मंगळवारी अटक केली. त्यास न्यायालयाने कारागृहात रवानगी केली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल व पीडित मुलगी यांच्यात ओळखीतून प्रेमसंबंध निमार्ण झाले होते. त्यातून १४ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता अमोल याने पीडित मुलीला पळवून नेले होते.
रात्रभर जंगलात फिरल्यानंतर अमोल याने मुलीशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यास तिने विरोध दर्शविला आहे. त्यानंतर मुलगी जंगलात झोपून गेल्याचे पाहून अमोल याने तिला तेथेच सोडून पलायन केले. सकाळी जाग आल्यानंतर भीतीपोटी मुलीने मैत्रीणीचे घर गाठले. तेथून आई, वडीलांना फोन करुन आई, वडीलांना बोलवून घेतले. दरम्यानच्या काळात मुलगी घरात नसल्याने पीडित मुलीच्या आईने एमआयडीसी पोलीस स्टेशनला तक्रार दिली होती, त्यावरुन अपहरणाचा गुन्हा दाखल झाला होता. आता या प्रकरणात आणखी विनयभंगाचे कलम वाढविण्यात आले. पीडित मुलीने दिलेल्या जबाबानंतर उपनिरीक्षक विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, सचिन मुंडे, गफूर तडवी व संदीप पाटील यांनी संशयित अमोल याला मोहाडीच्या जंगलातून ताब्यात घेतले. मंगळवारी न्यायालयाने त्याची कारागृहात रवानगी केली.