कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 05:59 IST2025-01-13T05:59:11+5:302025-01-13T05:59:36+5:30
महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते.

कर्जाच्या वसुलीसाठी मुलाचे अपहरण, पाच लाखांसाठी उकळले २९ लाख रुपये
कोल्हापूर : थकीत कर्जाच्या वसुलीसाठी कर्जदाराच्या मुलाचे अपहरण करून कर्जदाराला धमकावणाऱ्या खासगी सावकारांवर कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अशोक राजाराम पाटील, त्याचा मुलगा अवधूत (दोघेही रा. कळे, ता. पन्हाळा), प्रल्हाद
संपतराव भोसले, प्रदीप मधुकर भोसले, सरपंच मानसिंग विलास भोसले (तिघेही रा. आसगाव, ता. पन्हाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याबाबत विठ्ठल आनंदा पाटील (४४, रा. आकुर्डे, ता. पन्हाळा) यांनी शनिवारी फिर्याद दिली.
महावितरणचे इलेक्ट्रिक ठेकेदार असलेले विठ्ठल पाटील यांनी अशोक पाटील यांच्याकडून गरजेपोटी पाच लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. त्या बदल्यात अशोक पाटील व त्यांचा भागीदार प्रदीप भोसले यांच्याकडे विठ्ठल पाटील यांनी दरमहा वीस टक्के व्याजदराने २९ लाख रुपये परत केले. अशोक पाटील, त्याचा मुलगा अवधूत व प्रल्हाद भोसले यांनी आणखी पैशांसाठी तगादा लावला होता.
धमकावून २७ लाख परत घेतले
याबाबत फिर्यादींनी पोलिस अधीक्षक कार्यालयात तक्रार दिली होती. यावेळी कारवाई टाळण्यासाठी संशयित आरोपी अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी सत्तावीस लाख रुपये विठ्ठल पाटील यांच्या खात्यावर पाठवले. त्यानंतर लगेच विठ्ठल पाटील यांचा मुलगा पीयूष याला अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी ताब्यात घेतले. त्यानंतर धमकावून २७ लाख रुपये परत घेतले. या घटनेनंतर विठ्ठल पाटील यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबीयांसह उपोषण केले होते. त्यानंतर शाहूवाडी उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब पोवार यांच्या आदेशानुसार गुन्हा दाखल झाला.