भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2025 14:04 IST2025-11-17T13:40:07+5:302025-11-17T14:04:58+5:30
भाजपाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आनंद थंपी यांनी सोशल मीडियावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केले

भाजपानं तिकीट नाकारल्यानं RSS कार्यकर्त्यांनं उचललं टोकाचं पाऊल?; अखेरच्या क्षणी केला होता शिवसेनेशी संपर्क
केरळात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज RSS कार्यकर्त्याने टोकाचं पाऊल उचलल्याची खळबळजनक घटना घडली आहे. त्रिक्कण्णपुरम येथील रहिवासी आनंद थंपी यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत सापडला. तिरुवनंतपुरम नगरपालिकेत भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र जाहीर यादीत त्यांचे नाव न आल्याने ते नैराश्येत गेले. मात्र थंपी यांनी आमच्याकडे तिकीटासाठी कधीही मागणी केली नव्हती, त्यामुळे ही घटना तिकीट न मिळाल्याने घडली असं म्हणणं योग्य नाही असा दावा भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी केला आहे.
भाजपाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर आनंद थंपी यांनी सोशल मीडियावर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढणार असल्याचं घोषित केले. थंपी यांनी त्यांच्या मित्रांच्या व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून भाजपा आणि आरएसएस नेत्यांविरोधात आरोप करत आता जगण्याची इच्छा नाही असं म्हटलं होते. या संदेशात त्यांनी आरएसएस कार्यकर्त्यांना निवडणूक लढवण्याबाबत इच्छा व्यक्त केली होती. परंतु स्थानिक वाळू माफियांशी असलेल्या कनेक्शनमधून स्थानिक नेत्यांनी मला उमेदवारी दिली नाही असा आरोप थंपी यांनी केला. जेव्हा अपक्ष निवडणूक लढवण्याचं ठरलं तेव्हा मित्रांनीही त्यांच्यापासून अंतर बाळगले. त्यामुळे थंपी यांना नैराश्य आले होते.
राहत्या घरी आढळला मृतदेह
आनंद थंपी यांनी त्यांच्या राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. थंपीचा मेसेज वाचल्यानंतर त्यांचे मित्र घरी पोहचले होते, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला. तर या घटनेमुळे आम्हाला वेदना झाल्या आहेत. मी जिल्हाध्यक्षांशी बोललो, त्यांनीही इच्छुक उमेदवारांमध्ये त्यांचे नाव नसल्याचं सांगितले, परंतु आम्ही या घटनेची चौकशी करू. थंपी यांनी जिल्ह्यातील कुठल्याही नेत्याकडे तिकिटासाठी संपर्क साधला नव्हता. त्यामुळे थंपी यांचा मृत्यू तिकीट न मिळाल्याने झाल्याचं सांगणे योग्य नाही असं भाजपा प्रदेशाध्यक्ष राजीव चंद्रशेखर यांनी म्हटलं.
अखेरच्या क्षणी शिवसेनेशी संपर्क
दरम्यान, भाजपाकडून तिकीट न मिळाल्याने नाराज थंपी यांनी निवडणुकीत समर्थन देण्यासाठी आमच्याशी संपर्क साधला होता. जिल्ह्यातील पक्षातील नेत्यांनी संध्याकाळी एका हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत बैठकही घेतली. बैठकीनंतर थंपी यांनी शिवसेनेचे सदस्यत्व घेण्याचा निर्णय घेतला होता. शनिवारपासून ते प्रचारात येणार होते असं स्थानिक शिवसेना नेत्यांनी सांगितले.