करुणा मुंडेंना दोघांनी ३० लाखांना गंडवले, संशयित धनंजय मुंंडेंच्या परिचयाचे असल्याचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2022 10:14 IST2022-08-28T10:14:05+5:302022-08-28T10:14:56+5:30
Karuna Munde: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

करुणा मुंडेंना दोघांनी ३० लाखांना गंडवले, संशयित धनंजय मुंंडेंच्या परिचयाचे असल्याचा आरोप
संगमनेर (जि. अहमदनगर) : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या पत्नी, सामाजिक कार्यकर्त्या करुणा मुंडे यांची ३० लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी करुणा मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारत संभाजी भोसले (रा. कोंची, निमगाव जाळी, ता. संगमनेर), विद्या संतोष अभंग, प्रथमेश संतोष अभंग (रा. घुलेवाडी, ता. संगमनेर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
गुन्हा दाखल झालेल्यांची करुणा मुंडे यांच्यासोबत ओळख होती. त्या ओळखीतून त्यांनी मुंडे यांचा विश्वास संपादन केला. आमची लेवलसेट कन्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड नावाची कंपनी आहे. या कंपनीत तुम्ही पैसे गुंतवल्यास तुम्हाला खूप फायदा हाेईल, असे मुंडे यांना सांगण्यात आले. ठरल्याप्रमाणे त्यांनी जानेवारी २०२२ मध्ये रोख रक्कम आणि धनादेश स्वरुपात असे एकूण ३० लाख रुपये दिले. नफ्यापोटी फेब्रुवारीमध्ये मुंडे यांना एकदाच ४५ हजार रुपये मिळाले. त्यानंतर त्यांनी संबंधितांकडे पैसे मागितले असता त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली.
खोट्या गुन्ह्यात फसविण्याची तसेच बदनामी करण्याची धमकी दिल्याचे मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
आरोपी धनंजय मुंडे यांच्या परिचयाचे
करुणा यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारत भोसले यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. भोसले हे माझे पती धनंजय मुंडे यांच्या परिचयाचे आहेत. ते नेहमी आमच्या मुंबई येथील घरी येत-जात असल्याने माझीदेखील त्यांच्यासोबत ओळख झाली, असे त्यांनी म्हटले आहे.