दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 31, 2025 17:13 IST2025-08-31T16:26:52+5:302025-08-31T17:13:41+5:30
कर्नाटकात ऑनर किलिंगची धक्कादायक घटना समोर आली असून पित्यानेच मुलीची हत्या केली.

दुसऱ्या जातीतल्या मुलासोबत प्रेम करण्याची क्रूर शिक्षा; बापाने मुलीला दिला वेदनादायक मृत्यू,गावालाही फसवलं
Karnataka Honor Killing: कर्नाटकातील कलबुर्गी तालुक्यात ऑनर किलिंगचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कलबुर्गीत १८ वर्षांच्या मुलीची तिच्या वडिलांनी आणि नातेवाईकांनी हत्या केली. मुलीचे दुसऱ्या जातीतील मुलावर प्रेम असल्याने तिच्या वडिलांनी मुलीला संपवलं आणि हा आत्महत्येचा प्रकार असल्याचा दाखवण्याचा प्रयत्न केला. घरच्यांनी गावातल्या लोकांना सुरुवातीला मुलीने विष पिऊन आत्महत्या केली असं सांगितले होते. मात्र पोलिसांच्या तपासात संपूर्ण प्रकरण उघडकीस आलं.
हत्या झालेल्या कविताने कलबुर्गी येथील धर्मसिंह कॉलेजमधून पीयूसी पूर्ण केली होती. कुरुबा समुदायातील ऑटो चालक मल्लप्पासोबत तिचे प्रेमसंबंध होते असं म्हटलं जात आहे. कुटुंबाकडून वारंवार विरोध होऊनही कविताने त्याच्याशी लग्न करण्याचा आग्रह धरला आणि नकार दिल्यास पळून जाण्याची धमकीही दिली. २७ ऑगस्टच्या रात्री, याच मुद्द्यावरून झालेल्या भांडणानंतर तिचे वडील शंकर कोल्लूर, भाऊ शरणू आणि नातेवाईक दत्तप्पा चोलाबर्ड यांनी घरातच तिचा गळा दाबून खून केला. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी, आत्महत्या केल्याचे भासवण्यासाठी त्यांनी तिच्या तोंडात कीटकनाशक ओतलं.
दुसऱ्या दिवशी सकाळी, आरोपीने चिक्का गोब्बर रोडजवळील आरोपी शंकरच्या भावाच्या शेतात मृतदेह नेला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी तो जाळून टाकला. गावात चर्चा सुरु झाल्यानंतर शंकरने गावकऱ्यांना मुलीने विष प्राशन केल्याने तिचा मृत्यू झाल्याचे सांगितले. पोलिसांना संशय आला आणि त्यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान, त्यांना घटनास्थळी अर्धवट जळालेले अवशेष आढळले आणि कट उघडकीस आला. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांना एका १८ वर्षीय मुलीने आत्महत्या केली आहे आणि तिचे अंतिम संस्कार केले जात आहेत अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांना एका अज्ञात व्यक्तीकडून माहिती मिळाली की कविताची हत्या झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरु केला आणि सत्य समोर आणलं. पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. गावात कुटुंबाची चौकशी करण्यात आली. त्यानंतर शंकरने संपूर्ण घटना सांगितली. कविताच्या हत्येच्या आरोपाखाली वडील शंकर कोल्लूरला अटक करण्यात आली आहे. इतर दोन आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू आहे.
शंकरने मुलीच्या आंतरजातीय प्रेम संबंधांना विरोध केला होता. कारण त्याला पाच मुली आहेत आणि भीती होती की एका मुलीच्या आंतरजातीय विवाहामुळे इतर मुलींच्या लग्नात अडचणी येतील. कविताच्या प्रेम संबंधांची माहिती मिळताच शंकरने मुलीला समजावण्याचा प्रयत्न केला. पण मुलगी तिच्या भूमिकेवर ठाम राहिली. यानंतर, शरणप्पाने मुलीचा गळा दाबून खून केला आणि मृतदेहाच्या तोंडात कीटकनाशक टाकले जेणेकरून आत्महत्या वाटेल. गावकऱ्यांनीही आरोपींवर विश्वास ठेवला आणि तेही अंत्यसंस्कारातही सहभागी झाले. मात्र पोलिसांनी खून आणि पुराव्यांशी छेडछाड केल्याचा गुन्हा दाखल केला.