Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2025 12:50 IST2025-04-22T12:48:52+5:302025-04-22T12:50:39+5:30
Karnataka Former DGP Murder: माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून हत्येचा कट रचत होती.

Karnataka Murder: "मानेची नस कापल्यामुळे कसा होतो मृत्यू?"; माजी डीजीपींच्या हत्येपूर्वी पत्नीने फोनवर केलेलं सर्च
१९८१ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी ओम प्रकाश यांचा मृतदेह रविवारी बंगळुरूच्या पॉश एचएसआर लेआउटमधील त्यांच्या तीन मजली घराच्या तळमजल्यावर रक्ताच्या थारोळ्यात आढळला. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलिसांनी त्यांचा मुलगा कार्तिकेशच्या तक्रारीवरून त्यांची पत्नी पल्लवी यांना अटक केली आहे. ओमप्रकाश यांच्यावर त्यांच्या पत्नीने मिरची पावडर फेकली आणि नंतर त्यांची हत्या केली. या प्रकरणात एकामागून एक अनेक खुलासे होत आहेत.
माजी डीजीपी ओम प्रकाश यांची पत्नी गेल्या अनेक दिवसांपासून हत्येचा कट रचत होती आणि तिच्या फोनवर मान कशी कापायची याची पद्धत शोधत होती, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. पल्लवी यांच्या फोन सर्चवरून असं दिसून आलं की, मानेजवळील नस कापल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा मृत्यू कसा होतो? हे जाणून घेण्याचा त्या प्रयत्न करत होत्या. गेल्या ५ दिवसांत याबाबत त्यांनी अनेक वेळा सर्च केलं होतं. सध्या पोलिसांनी पत्नी पल्लवी यांनी अटक केली आहे आणि १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
पल्लवी यांनी तपास अधिकाऱ्यांना सांगितलं की, ती सततच्या घरगुती हिंसाचाराला कंटाळली होती. पतीची हत्या केल्यानंतर त्यांनी मैत्रिणीला व्हिडीओ कॉल केला आणि "मी राक्षसाला मारलं आहे" असं सांगितलं. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासात असंही आढळून आलं आहे की जोरदार वादानंतर पल्लवी यांनी ओम प्रकाश यांच्या चेहऱ्यावर मिरची पावडर फेकली होती. तसेच चाकूने अनेक वार केले ज्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
"आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी"; मुलाचा मोठा दावा
निवृत्त अधिकाऱ्याचा मुलगा कार्तिकेशने पोलिसांना सांगितलं आहे की, त्याची आई पल्लवी आधीच त्याच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी देत होती. या धमक्यांमुळे ओम प्रकाश हे त्यांच्या बहिणीकडे राहायला गेले होते, पण हत्येच्या दोन दिवस आधी त्यांची मुलगी कृती त्यांना भेटायला आली आणि परत येण्यास दबाव आणला. तिने तिच्या वडिलांना त्यांच्या इच्छेविरुद्ध घरी परत आणलं. आई आणि बहीण दररोज वडिलांशी भांडायची. कार्तिकेशने त्याच्या तक्रारीत ही सर्व माहिती दिली आहे.