जिल्हाधिकाऱ्यांच्या घराजवळ पुरला मृतदेह; ‘दृश्यम’ स्टाईल केली हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 10:44 IST2024-10-28T10:43:22+5:302024-10-28T10:44:00+5:30
विशेष म्हणजे ‘दृश्यम’ चित्रपट पाहून हे कृत्य केल्याची कबुली आराेपीने दिली आहे.

जिल्हाधिकाऱ्यांच्या घराजवळ पुरला मृतदेह; ‘दृश्यम’ स्टाईल केली हत्या
कानपूर : येथे एका जिम ट्रेनरने प्रेयसीची हत्या करून तिचा मृतदेह जिल्हाधिकाऱ्यांचे निवासस्थान असलेल्या परिसरात पुरला. चार महिन्यांनंतर उघडकीस आलेल्या या प्रकरणात आरोपी विमल सोनी यास अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे ‘दृश्यम’ चित्रपट पाहून हे कृत्य केल्याची कबुली आराेपीने दिली आहे.
मृत एकता गुप्ता (वय ३२) विवाहित हाेती. यादरम्यान आराेपीचा विवाह ठरल्याने ती अस्वस्थ हाेती. आपला विवाह ठरल्यावर वाद पेटल्याने आराेपीने प्रेयसीचा काटा काढण्याचे ठरवले. ‘दृश्यम’ चित्रपट पाहून त्याने तिची हत्या करून मृतदेह व्हीव्हीआयपींची निवासस्थाने असलेल्या परिसरात पुरला. या भागात न्यायाधीशांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. घटनास्थळावर आठ फूट खाेल खड्डा खाेदून मृतदेह पुरल्याची कबुली आराेपीने दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
कारमध्ये आले अन्...
२४ जून राेजी दाेघे वाद मिटवण्याच्या निमित्ताने बाहेर पडले. वाद विकाेपाला जाताच विमलने तिच्या मानेवर वार केला. ती बेशुद्ध पडली आणि नंतर तिचा मृत्यू झाला. मग ‘दृश्यम’प्रमाणे त्याने मृतदेह व्हिआयपी निवासस्थान परिसरात पुरला.
तपासाला विलंब
पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार पती राहुल गुप्ता यांनी दिली हाेती. परंतु, आराेपी माेबाइल वापरत नसल्याने शाेधणे कठीण हाेते. त्यामुळे तपासास विलंब झाल्याचे पाेलिस उपायुक्त श्रवणकुमारसिंह यांनी सांगितले.