पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या ज्योती मल्होत्राला हरियाणाच्या हिसार पोलिसांनी गुरुवारी न्यायालयात हजर केलं. सुनावणीदरम्यान, न्यायालयाने पोलिसांना ज्योतीच्या मेडिकल रिपोर्टबद्दल विचारलं आणि कागदपत्रं पाहिली.
न्यायालयात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्योतीच्या बँक अकाऊंटचे तसेच फोन आणि लॅपटॉपचे फॉरेन्सिक डिटेल्स दोन दिवसांत उपलब्ध होतील, ज्याच्यासाठी तिची चौकशी करणं अत्यंत आवश्यक आहे. ज्योतीने देशातील अनेक राज्यांमध्ये जाऊन तिचे व्हिडीओ बनवले होते. तिथल्या पोलिसांशी संपर्क करण्यात आला आहे, गरज पडल्यास तिला तिथे नेऊन चौकशी करावी लागू शकते.
ज्योती उत्तरं देण्यास करते टाळाटाळ
चौकशीदरम्यान ज्योती अनेक प्रश्नांची उत्तरे देण्यास टाळाटाळ करत असल्याचं हिसार पोलिसांनी सांगितलं. पहलगाम हल्ल्यानंतर जेव्हा भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव होता, तेव्हा ज्योती एका पाकिस्तानी गुप्तचर संस्थेच्या अधिकाऱ्याच्या संपर्कात होती अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. ज्योतीच्या ३ मोबाईल आणि लॅपटॉपचा फॉरेन्सिक रिपोर्ट दोन दिवसांत येईल.
४ वेळा मुंबईला गेलेली ज्योती मल्होत्रा; गर्दीच्या ठिकाणांचे फोटो आणि व्हिडीओ कोणाला पाठवले?
हरियाणातील हिसार येथील ३३ वर्षीय युट्यूबर आणि ट्रॅव्हल ब्लॉगर ज्योती मल्होत्राला १७ मे रोजी पाकिस्तानच्या गुप्तचर संस्थेसाठी (आयएसआय) हेरगिरी केल्याच्या आणि संवेदनशील माहिती शेअर केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. तपास यंत्रणांना असं आढळून आले आहे की, ज्योती चार वेळा मुंबईत आली होती. ज्योती २०२४ मध्ये तीनदा आणि २०२३ मध्ये एकदा मुंबईत आली. प्रत्येक वेळी तिने मुंबईच्या विविध भागांचे फोटो काढले आणि व्हिडीओ बनवले होते.