ज्वेलर्सचे दीड कोटींचे दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक, आरोपी झारखंडचे रहिवासी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2021 08:07 IST2021-04-01T08:06:46+5:302021-04-01T08:07:12+5:30
वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूलाच झारखंडच्या या टोळक्याने फळ विक्रीचे दुकान गाळा भाड्याने घेऊन सुरू केले होते. त्याच दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून या ज्वेलर्सच्या दुकानात शिरकाव केला होता.

ज्वेलर्सचे दीड कोटींचे दागिने चोरणाऱ्या तिघांना अटक, आरोपी झारखंडचे रहिवासी
ठाणे : ठाण्यातील शिवाईनगर येथील वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल एक कोटी ३७ लाख दोन हजारांचे सोने-चांदीचे दागिने लुटणाऱ्या सुलतान शेख (वय २९, रा. निमाईटोला, झारखंड), अब्दुल हक (३४, रा. उत्तर पियारपूर, झारखंड) आणि आलमगिर शेख (३३, रा. बोलटोला, झारखंड) या तिघांना कासारवडवली पोलिसांनी मंगळवारी अटक केली. या तिघांनाही मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेतल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. विनय राठोड यांनी बुधवारी दिली.
वारीमाता गोल्ड या ज्वेलर्सच्या दुकानाच्या बाजूलाच झारखंडच्या या टोळक्याने फळ विक्रीचे दुकान गाळा भाड्याने घेऊन सुरू केले होते. त्याच दुकानाच्या भिंतीला भगदाड पाडून या ज्वेलर्सच्या दुकानात शिरकाव केला होता. नंतर गॅस कटरच्या मदतीने दागिन्यांची तिजोरी फोडून १६ ते १७ जानेवारी २०२१ रोजी लूटमार करून पलायन केले होते. वर्तकनगर पोलीस ठाण्यात १७ जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. अत्यंत नियोजनबद्ध रीतीने इतक्या मोठया प्रमाणात ही लूट झाल्याने गुन्हे अन्वेषण विभागाकडूनही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू होता. पोलीस उपायुक्त डॉ. राठोड यांनी या प्रकरणाच्या तपासाकरिता वागळे इस्टेट परिमंडळातील वर्तकनगर, वागळे इस्टेट, कापूरबावडी आणि कासारवडवली अशा सर्वच पोलीस ठाण्यांना तपासाचे आदेश दिले होते. कासारवडवलीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर खैरनार यांच्या पथकाकडूनही या प्रकरणाचा तपास सुरू होता.
याच चोरीतील संशयित सुलतान शेख याच्यासह तिघे आरोपी हे पटना येथील लोकनायक जयप्रकाश एअरपोर्ट येथून मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३० मार्च रोजी येणार असल्याची गुप्त माहिती खैरनार यांना मिळाली होती. त्याच आधारे पोलीस निरीक्षक जयराज रणवरे यांच्या नेतृत्वाखाली एका पथकाची निर्मिती करण्यात आली. सापळा लावून या पथकाने मुंबई विमानतळावर मुंबई पोलिसांच्या मदतीने या तिघांनाही ताब्यात घेतले. त्यांचा या ज्वेलर्सच्या चोरीत सक्रिय सहभाग असल्याचे चौकशीत उघड झाले. ते पुणे परिसरातील आणखी एक ज्वेलर्सचे दुकान रात्री फोडून चोरी करण्यासाठी आल्याची कबुली त्यांनी दिली.
तिघेच या चोरीचे खरे सूत्रधार
पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, अपर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक खैरनार, रणवरे, अविनाश काळदाते, वैभव धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक शहादेव पालवे, सागर जाधव, आदींच्या पथकाने हा यशस्वी तपास केला.
याआधी नवी मुंबईच्या एपीएमसी पोलिसांनी याच चोरीतील दोघांना अटक केली होती. त्यांना वर्तकनगर पोलिसांच्या स्वाधीन केले होते. आता अटक केलेले तिघे या चोरीचे सूत्रधार असल्याची माहिती उपायुक्त डॉ. राठोड यांनी दिली.