Crime: बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 12:17 IST2025-12-19T12:16:55+5:302025-12-19T12:17:34+5:30
Jharkhand Shocking News: बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे.

Crime: बंदुकीच्या धाकावर अल्पवयीन मुला-मुलीला शारीरिक संबंधास पाडले भाग; MMS बनवून पैसे उकळले
झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यात एक संतापजनक घटना घडली. तिलैया पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही अज्ञात तरुणांनी एका अल्पवयीन मुला-मुलीला बंदुकीच्या धाकावर ओलीस धरून त्यांना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे, तर या घटनेचा व्हिडिओ बनवून तो व्हायरल करण्याची धमकी देत त्यांच्याकडून पैसेही उकळले. याप्रकरणी पोलिसांत तक्रार देण्यात आली असून पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी सकाळी एक अल्पवयीन मुलगा आणि मुलगी दुचाकीवरून वृंदाहा धबधब्यावर गेले होते. निसर्गरम्य परिसर पाहून परतत असताना, जरगा पंचायत जवळील निर्जन रस्त्यावर अज्ञात तरुणांच्या एका टोळीने त्यांची दुचाकी अडवली. आरोपींनी सर्वात आधी त्यांच्या गाडीची चावी हिसकावून घेतली आणि त्यांना धमकावण्यास सुरुवात केली.
पीडित मुलाने दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपींनी बंदुकीचा धाक दाखवून त्यांना जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. तसेच त्यांचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली आणि त्याच्याकडे १० हजार रुपये मागितले. आपल्यावरील संकट पाहून पीडित मुलाने प्रसंगावधान राखले आणि तातडीने आपल्या मित्रांशी संपर्क साधला. त्याने मित्रांकडून ४ हजार ६३५ रुपये उसने मागवले. जमा झालेली ही रक्कम त्याने आरोपींच्या सांगण्यानुसार एका तरुणाच्या खात्यावर ऑनलाइन ट्रान्सफर केली. पैसे मिळाल्यावर आरोपींनी त्यांना तिथून जाऊ दिले.
आरोपींचा शोध सुरू
आरोपींच्या तावडीतून सुटल्यानंतर पीडिताने थेट तिलैया पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार पोलिसांना सांगितला. तिलैया पोलीस ठाण्याचे प्रभारी विनय कुमार यांनी सांगितले की, "पीडिताने या घटनेबाबत लेखी तक्रार दिली आहे, ज्या व्यक्तीच्या खात्यावर पैसे पाठवले गेले आहेत, त्या माहितीच्या आधारे आणि पीडिताने सांगितलेल्या वर्णनानुसार आरोपींचा शोध घेतला जात आहे."