लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : आरग (ता. मिरज) येथील पद्मावती मातेच्या मंदिरातून चोरट्यानी तब्बल 15 लाख रुपयांचे सोन्याचांदीचे दागिने लंपास केले. बुधवारी रात्री ही चोरी झाली. गावात भरवस्तीत चोरी झाल्याने एकच खळबळ माजली आहे.
चोरट्यानी गाभाऱ्यात शिरून मूर्तीच्या अंगावरील १८ तोळे सोने व चांदीचे दागिने लांबविले. मंदिराचे पुजारी सकाळी पूजाअर्चा करण्यासाठी आले असता चोरी झाल्याचे उघडकीस आले. चोरीची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांनी धाव घेतली. श्वान पथक ठसेतज्ज्ञ व सायबर तपास पथकाच्या मदतीने चोरट्याचा माग काढण्याचा प्रयत्न केला.
बुधवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या बाजूस असणाऱ्या जिन्याने मंदिरात प्रवेश केला. गाभाऱ्यासमोरील लाकडी दरवाजाची कडी कटावनीच्या साह्याने उचकटली. गाभाऱ्यात प्रवेश करून सुमारे 18 तोळे दागिने लंपास केले. पुजार्यांना सकाळी मंदिराची कडी तुटल्याचे दिसले. आत चोरी झाल्याचेही दिसले. त्यांनी तात्काळ मिरज पोलीस स्टेशनला माहिती दिली. भरवस्तीतील चोरीमुळे भाविकांना मोठा धक्का बसला. येथील लोकवस्तीत पद्मावती मातेचे मंदिर आहे. नेहमीच भाविकांची दर्शनासाठी गर्दी असते. पोलिसांनी मंदिर परिसरात पाहणी केली. सकाळी श्वान पथकासह, एलसीबी, फॉरेन्सिक लॅबचे पोलीस दाखल झाले.
गेल्याच आठवड्यात देवीचा महोत्सव खूपच मोठ्या जल्लोषात साजरा झाला होता. तीन दिवसांच्या उत्सवला सांगली, कोल्हापूर जिल्ह्यासह कर्नाटकतूनही हजारो भाविक आले होते. हे उत्सवी वातावरण अदयाप कायम असतानाच चोरीची घटना घडली.