हत्याप्रकरणी जदयू उमेदवार ‘बाहुबली’ अटकेत; १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 13:32 IST2025-11-03T13:31:58+5:302025-11-03T13:32:33+5:30
‘जंगलराज’ची पुनरावृत्ती थांबवा : अमित शाह

हत्याप्रकरणी जदयू उमेदवार ‘बाहुबली’ अटकेत; १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत रवानगी
एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा: जनसुराज पक्षाचे समर्थक दुलारचंद यादव यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ‘जदयू’चे उमेदवार व स्थानिक ‘बाहुबली’ म्हणून ओळख असलेले अनंतसिंह यांना अटक केली असून, सर्व पाच आरोपींना अटक केली आहे. अनंतसिंह यांना त्यांच्या दोन सहकाऱ्यांसह १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
विरोधकांनी प्रशासनाच्या मदतीने आपल्या आजोबांची हत्या केल्याचा आरोप नीरज याने केला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अनंतसिंह यांच्यासह मणिकांत ठाकूर व रंजित राम यांना आतापर्यंत अटक केली आहे. अनंतसिंह मोकामा मतदारसंघातून ‘जदयू’च्या तिकिटावर निवडणूक लढवित आहेत.
दुलारचंद यांच्या मृतदेहाच्या तपासणीत मारामुळे हृदयगती थांबून त्यांचा मृत्यू झाला असल्याचे आढळून आले आहे. यावरून हे हत्येचेच प्रकरण असल्याचे सिद्ध होते, असे पोलिसांनी म्हटले आहे. हत्या प्रकरणात चार एफआयआर दाखल असून यात एक आचारसंहिता उल्लंघनाशी संबंधित आहे.
‘हत्या, खंडणी मंत्रालये उघडली जातील’
मुजफ्फरपूर : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी येथील जाहीर सभेत राजद नेते लालुप्रसाद यादव यांच्या कुटुंबावर जोरदार टीका केली. लालूंच्या मुलाची बिहारमध्ये सत्ता आली तर ‘हत्या, अपहरण आणि खंडणी’, अशी तीन मंत्रालये उघडली जातील, असे ते म्हणाले. एनडीए सरकार कायम राहिले तर बिहारला पूरमुक्त राज्य केले जाईल व यासाठी विशेष मंत्रालयाची स्थापना केली जाईल, असे शाह म्हणाले. राजद सत्ताकाळात पाहिलेल्या ‘जंगलराज’ची पुनरावृत्ती थांबवा, असे आवाहन त्यांनी केले.
काँग्रेसच्या ४० स्टार प्रचारकांची फौज
बिहार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेसच्या स्टार प्रचारकांमध्ये काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांच्यासह अपक्ष खासदार पप्पू यादव अशा ४० जणांचा समावेश आहे. दुसऱ्या टप्प्यात ११ नोव्हेंबर रोजी मतदान होईल.