घराच्या बाल्कनीतून 50 लाख खाली फेकले, भाच्याने उचलले; लाच प्रकरणात धक्कादायक खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2023 14:19 IST2023-03-27T14:13:18+5:302023-03-27T14:19:04+5:30
रात्री दहा वाजण्याच्या सुमारास फ्लॅटमधून 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे बंडल खाली फेकण्यात आले.

फोटो - दैनिक भास्कर
जवरीमल बिश्नोई यांच्या आत्महत्येप्रकरणी नवा खुलासा झाला आहे. जवरीमल यांना शुक्रवारी लाच घेताना पकडण्यात आले, त्याच दिवशी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास त्यांच्या फ्लॅटमधून 500 आणि 200 रुपयांच्या नोटांचे बंडल खाली फेकण्यात आले. जे जवरीमल यांच्या भाच्याने उचलले होते. त्याचा व्हिडीओ आता समोर आला असून जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडीओमध्ये जवरीमलचा भाचा पैसे उचलताना दिसतो. 50 लाख रुपये असल्याचे सांगितले जात आहे.
सीबीआयने पन्नास लाख रुपयेही जप्त केले आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या दिवशी अटक करण्यात आली त्याच दिवशी घराची झडती घेण्यात येत होती. बिश्नोई यांच्या पत्नीने पैशांचे काही बंडल घराच्या बाल्कनीतून खाली फेकले. बिष्णोई यांच्या भाच्याने हे पैसे खाली जमा केले. हा व्हिडिओ शुक्रवारी रात्री 10.42 वाजताचा आहे. बिश्नोई यांच्याकडे एवढी रोकड कुठून आली याचा शोध घेतला जात आहे.
जवरीमल बिश्नोई यांना शुक्रवारी सीबीआयने लाचखोरी प्रकरणात अटक केली होती. यानंतर शनिवारी कार्यालयाची झडती घेत असताना जवरीमल यांनी चौथ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. त्यांचा भाऊ संजय कुमार आणि मित्र अभिषेक मिश्रा यांनी सीबीआय अधिकाऱ्यांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप केला आहे. दुसरीकडे जिल्हास्तरीय अधिकाऱ्याच्या उपस्थितीत शवविच्छेदन झाल्यानंतर कुटुंबीय बिश्नोई यांचा मृतदेह ताब्यात घेण्याच्या तयारीत होते.
या प्रकरणाची जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांकडे चौकशी करण्याची मागणी नातेवाईकांनी केली होती. बिश्नोई यांच्याविरोधात लाच घेतल्याची तक्रार सीबीआयकडे करण्यात आली होती. याप्रकरणी केंद्रीय तपास यंत्रणेने कारवाईसाठी सापळा रचला होता. शुक्रवारी सहसंचालक बिश्नोई यांना पाच लाख रुपयांची लाच घेताना पकडण्यात आले. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"