स्टंटबाजी पडली महागात; ११ थार आणि ३ स्कॉर्पिओ जप्त, जयपूर पोलिसांची मोठी कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 13:35 IST2025-02-11T13:35:02+5:302025-02-11T13:35:34+5:30
याप्रकरणी पोलिसांनी ७ स्टंटबाजी करणाऱ्यांना अटक केली आहे.

स्टंटबाजी पडली महागात; ११ थार आणि ३ स्कॉर्पिओ जप्त, जयपूर पोलिसांची मोठी कारवाई
जयपूर : राजस्थानची राजधानी जयपूरमध्ये पोलिसांनी बेपर्वा वाहन चालवणे आणि रस्त्यावर धोकादायक स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. थार आणि स्कॉर्पिओ सारख्या वाहनांमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. अनेक ठिकाणी मोठी कारवाई करत जयपूर पोलिसांनी ११ थार आणि ३ स्कॉर्पिओ गाड्या जप्त केल्या आहेत.
याप्रकरणी पोलिसांनी ७ स्टंटबाजी करणाऱ्यांना अटक केली आहे. रस्त्याला रेस ट्रॅक समजून बेपर्वाईने गाडी चालवणाऱ्यांवर पोलिसांनी ही कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपाखाली या ७ आरोपींना अटक केली आहे. तसेच, पोलिसांनी अनेक ठिकाणी मोठी कारवाई करत ११ थार आणि ३ स्कॉर्पिओ गाड्या जप्त केल्या आहेत.
अलिकडेच ब्लॅक कलरच्या थार आणि स्कॉर्पिओसह स्टंटचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या आधारावर कारवाई करण्यात आली आहे, असे पोलीस उपायुक्त अमित कुमार यांनी सांगितले. दरम्यान, या धोकादायक स्टंटबाजीमुळे लोकांच्या जीवाला धोका निर्माण होत होता. त्यामुळे शहरातील विविध पोलिस ठाण्यांमध्ये अशा लोकांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आले होते.
सध्याच्या तरुणाईमध्ये सोशल मीडियावर चमकोगिरी करण्यासाठी वेगवेगळ्या रिल्स काढून व्हायरल करण्याचे फॅड वाढले आहे. यात स्टंटबाजीचे करण्याचेही फॅड आहे. या स्टंटबाजीमुळे त्याच्या स्वतःसह इतरांच्या जीवाला देखील धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.
दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कर्नाटकातील बंगळुरूमध्ये शहरातील वर्दळीच्या रस्त्यावर धोकादायक स्टंट करताना दोन जण दिसत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर सुरक्षिततेचे पाऊल उचलत बंगळुरू पोलिसांनी त्या स्टंटबाजी करणाऱ्या दोघांवर कडक कारवाई केली आहे.