एकही दिवस कामावर न जाता ५ वर्षे मिळाला ३७ लाख पगार; अधिकारी नवऱ्याचा 'भ्रष्टाचार'
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2025 15:14 IST2025-10-28T15:13:56+5:302025-10-28T15:14:34+5:30
जयपूरमधील अधिकारी प्रद्युम्न दीक्षितने केलेल्या भ्रष्टाचाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे.

फोटो - आजतक
जयपूरमधील अधिकारी प्रद्युम्न दीक्षितने केलेल्या भ्रष्टाचाराची सध्या जोरदार चर्चा रंगली आहे. त्याने त्याची पत्नी पूनम दीक्षितला दोन कंपन्यांमध्ये नोकरी मिळवून दिली. पण ती कामावर कधी गेलीच नाही. तरीही तिला महिन्याला १.६० लाख पगार देखील मिळवून दिला. पाच वर्षांपासून अंदाजे ३७.५४ लाख पाच वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये जमा केले गेले. धक्कादायक बाब म्हणजे अधिकाऱ्याची पत्नी एकही दिवस कामावर गेली नाही आणि तिला नियमितपणे पगार मिळत होता.
पगाराच्या सर्व बिलांवर स्वाक्षऱ्या स्वतः प्रद्युम्न दीक्षित याच्या होत्या. या संदर्भात एसीबीला एक तक्रार मिळाली. तक्रारीची पडताळणी आणि चौकशी केल्यानंतर धक्कादायक खुलासा केला आहे. तक्रार मिळाल्यानंतर एसीबीने तपास सुरू केला आणि असं आढळून आलं की, पूनम दीक्षितचा पती दरमहा तिच्या पगाराच्या बिलांवर स्वाक्षरी करत होता, त्यानंतर पगाराची रक्कम पत्नीच्या बँक खात्यात जमा होत होती.
डीओआयटीचे सहसंचालक प्रद्युम्न दीक्षितने त्याची पत्नी पूनम दीक्षितसाठी ऑरियनप्रो सोल्युशन्स लिमिटेड आणि ट्रायजेंट सॉफ्टवेअर प्रायव्हेट लिमिटेडमध्ये नियुक्ती केली होती. दोन्ही कंपन्यांमध्ये नोकरी करत असूनही पूनम दीक्षित एकही दिवस ड्युटीवर हजर राहिली नाही. दोन्ही कंपन्यांनी जानेवारी २०१९ ते सप्टेंबर २०२० पर्यंत पगार म्हणून पूनम दीक्षितच्या पाच बँक अकाऊंटमध्ये ३७,५४,४०५ रुपये जमा केले.
राजस्थान उच्च न्यायालयात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली. सप्टेंबर २०२४ मध्ये न्यायालयाने एसीबीला गुन्हा दाखल करून चौकशी करण्याचे निर्देश दिले. न्यायालयाच्या आदेशानंतर एसीबीने ३ जुलै २०२५ रोजी तक्रार दाखल केली. त्यानंतर, कंपन्या आणि पूनम दीक्षितच्या बँक अकाऊंटची चौकशी करण्यात आली. तपासात भ्रष्टाचार उघडकीस आला.