जगदीश वाघ प्रकरण : तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 07:08 AM2019-11-26T07:08:18+5:302019-11-26T07:08:33+5:30

फसवणुकीच्या आरोपाखाली रामनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती.

Jagdish Tiger Case: Three policemen suspended for action | जगदीश वाघ प्रकरण : तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

जगदीश वाघ प्रकरण : तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई

Next

डोंबिवली : फसवणुकीच्या आरोपाखाली रामनगर पोलीस ठाण्यातील कोठडीत असलेला बांधकाम व्यावसायिक जगदीश वाघ याने लघुशंकेला जाण्याच्या बहाण्याने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पोबारा केल्याची घटना रविवारी सकाळी घडली होती. याप्रकरणी हलगर्जी केल्याने तीन पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस नाईक हेमंत राणे, पोलीस शिपाई सचिन वानखेडे आणि गिरीश शिर्के अशी निलंबन केलेल्या पोलिसांची नावे आहेत.
वाघ याने रविवारी सकाळी ९ च्या सुमारास लघुशंका आल्याचे या तिघा पोलिसांना सांगितले. त्याला पोलीस ठाण्याबाहेर असलेल्या शौचालयाजवळ पोलीस घेऊन गेले. यावेळी, तिघा पोलीस कर्मचाऱ्यांच्या हातावर तुरी देत त्याने तेथून पोबारा केला. त्यानंतर, रामनगर पोलिसांनी मुंबई विमानतळावरून वाघ याला ताब्यात घेत त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.

पोलीस ठाण्याचे शौचालय खराब झाल्याने लघुशंकेसाठी वाघ याला बाहेर काढले होते. यावेळी, पोलिसांची नजर चुकवून वाघ पळून गेल्याचे डोंबिवलीचे सहायक पोलीस आयुक्त दिलीप राऊत यांनी सांगितले.

यासारख्या घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी कोठडीच्या बाहेर दरवाजा लावण्यात येणार आहे. तसेच, वाघ याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी अजून पोलीस कर्मचारी नेमल्याचेही राऊत यांनी सांगितले. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.

तीन दिवसांची पोलीस कोठडी
पोलीस कोठडी संपल्याने वाघ याला सोमवारी कल्याण न्यायालयात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. तसेच, कोठडीतून पळाल्याने त्याच्याविरोधात आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे राऊत यांनी सांगितले.
तसेच, वाघ याने अन्य एका व्यक्तीची ५० लाख रुपयांची फसवणूक केली असल्याची तक्रार प्राप्त झाली असून चौकशी सुरू आहे. ज्या नागरिकांची फसवणूक झाली आहे, त्यांनी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज द्यावा, असेही आवाहन राऊत यांनी केले.

Web Title: Jagdish Tiger Case: Three policemen suspended for action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.