जीव बचावला हे महत्वाचं! अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरट्याने लांबवली
By पूनम अपराज | Updated: July 20, 2021 21:24 IST2021-07-20T21:22:17+5:302021-07-20T21:24:55+5:30
Chain Snatching Case : याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

जीव बचावला हे महत्वाचं! अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातली सोनसाखळी चोरट्याने लांबवली
पूनम अपराज
मुंबई - दादरच्या शिवाजी पार्क परिसरात चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. काल रात्री ९.३० वाजताच्या सुमारास अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या गळ्यातील ३ तोळ्यांची सोनसाखळी लांबवली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.
मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सविता मालपेकर या काल रात्री ८.४५ च्या सुमारास शिवाजी पार्क येथे वॉल्कसाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्या शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर मोबाईलवर बोलत बसल्या होत्या. दरम्यान एक इसम टाईम क्या हुआ! विचारू लागला. त्यावर सविता मालपेकर यांनी घड्याळ घातले नसल्याचे सांगितले. त्यानंतर त्या इसमाने मोबाईल पाहून सांगा वेळ अशी विनवणी केली. पण मोबाईलवर बोलायचं होत असल्याने सविता मालपेकर यांनी वेळ काय झाली हे सांगण्यास नकार दिला. नंतर सविता या पुन्हा स्काऊट हॉलच्या दिशेने वॉल्क करू लागल्या. त्यावेळी मागून त्यांच्या गळ्यावर कोणीतरी झडप घातली. दरम्यान सविता मालपेकर यांचा ड्रेस चोरट्याने फाडून सोनसाखळी लंपास केली.
त्याचवेळी शिवाजी पार्क पोलिसांनी तात्काळ धाव घेऊन सविता यांना आपल्या गाडीतून पोलीस ठाण्यात नेले. ताबडतोब घटनास्थळाचे सीसीटीव्ही तपासून चोराची ओळख पटवण्यात आली. तक्रार दाखल करून शिवाजी पार्क पोलिसांनी चोरट्याचा शोध घ्यायला सुरुवात केली. अभिनेत्री सविता मालपेकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले, चोरट्याने मागून येऊन माझ्या मानेवर झडप घालून सोनसाखळी लांबवली. मात्र, त्याने धारदार शस्त्र वापरले असते तर मला इजा झाली असती. माझा जीव वाचला हे महत्वाचं. शिवाजी पार्क पोलीस देखील तात्काळ मदतीला धावून आल्याने त्यांनी त्यांचे आभार मानले.