इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : हवाला ऑपरेटर महिलेला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2019 17:59 IST2019-10-25T17:53:25+5:302019-10-25T17:59:43+5:30
ईडीकडून याआधी अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाबावरून हवालाला अटक करण्यात आली आहे.

इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरण : हवाला ऑपरेटर महिलेला अटक
मुंबई - वरळी येथील इकबाल मिर्ची मालमत्ता प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाकडून (ईडी) अलीकडेच चौथ्या आरोपीला अटक करण्यात आली आहे. ईडीकडून याआधी अटक करण्यात आलेल्या रणजित बिंद्रा या आरोपीच्या जबाबावरून हवाला ऑपरेटर रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल आणि कुख्यात गुंड दाऊद इब्राहिमचा हस्तक इक्बाल मिर्ची यांची भागीदारी होती. त्यामुळे या प्रकरणाकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
वरळी येथील सीजे हाऊसमधील त्यांच्या मालकीच्या दोन फ्लॅटच्या खरेदी व्यवहारबाबत ईडी सध्या चौकशी करत आहेत. अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा खास हस्तक असेलेल्या मिर्चीच्या मालकीच्या सीजे हाऊसमधील दोन फ्लॅट पटेल यांनी विकत घेतली असल्याचा अधिकाऱ्यांचा संशय आहे. याप्रकरणात अटक केलेल्या या रणजित सिंग बिंद्रा व हारुण युसूफ या दलालाच्या चौकशीतून ही माहिती पुढे आली आहे. २००७ मध्ये या दोन फ्लॅटचा विकास करार होऊन हस्तांतर करण्यात आले. पटेल यांचे त्या व्यवहारावर सहमालक म्हणून स्वाक्षरी असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवारी इकबाल मिर्ची याचा खास हस्तक हुमायूं मर्चंट याला अटक केल्यानंतर ईडीने रिंकू देशपांडे या महिला आरोपीला अटक केली आहे.
रिंकू देशपांडे आणि तिच्या कुटुंबियांचे इकबाल मिर्चीसोबत संबंध होते. वरळी येथील जमिनीच्या व्यवहारात रिंकू देशपांडे हिने रणजित बिंद्रा याला ४० कोटी रुपयांची दलाली मिळवून देण्यासाठी मदत केली होती. वरळी येथील व्यवहार करण्यात येणाऱ्या इमारतीत काही बनावट भाडेकरूंना फक्त कागदावर दाखविण्यात आलं असल्याची माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. अटक आरोपी रणजित बिंद्राने ईडी चौकशीत ३ जागांच्या व्यवहारासाठी इकबाल मिर्चीला तो लंडनमध्ये भेटला होता अशी कबुली दिली आहे. यासाठी सन ब्लिक रियल इस्टेट या कंपनीचा ब्रोकर असल्याचे सांगत तो इकबाल मिर्चीला भेटला होता. रिंकू देशपांडे ही मोठी हवाला ऑपरेटर असल्याची माहिती ईडीच्या चौकशीत रंजित बिंद्रा याने दिली आहे.
मुंबई - इकबाल मिर्ची जमीन गैरव्यवहार प्रकरण : हवाला ऑपरेटर महिलेला अटक https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) October 25, 2019