Instagram वर महिला डॉक्टरच्या प्रेमात पडली, केंद्रीय गृहमंत्रालयातून आला फोन; ८० लाखांचा गंडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2021 12:49 IST2021-06-14T12:47:00+5:302021-06-14T12:49:10+5:30
फसवणूक झालेल्या पीडित महिलेने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Instagram वर महिला डॉक्टरच्या प्रेमात पडली, केंद्रीय गृहमंत्रालयातून आला फोन; ८० लाखांचा गंडा
बंगळुरूमध्ये राहणाऱ्या एका ५० वर्षीय विधवा महिलेला एका व्यक्तीनं त्याच्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून ८० लाखांचा चुना लावला आहे. यात २-३ आरोपींचा समावेश आहे. या व्यक्तींनी स्वत:ची ओळख केंद्रीय अर्थ मंत्रालय आणि नवी दिल्लीतील IGI एअरपोर्टचा अधिकारी असं सांगितली होती. या महिलेला ह्दयसंदर्भातील आजार असून ती सिंगल मदर आहे.
बंगळुरू मिररच्या रिपोर्टनुसार फसवणूक झालेल्या पीडित महिलेने आरोपींविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हा व्यक्ती मेविस हर्मन (Mavis Hormon) नावानं इन्स्टाग्रामवर अकाऊंट चालवत होता. महिलेने तक्रारीत म्हटलंय की, २३ जानेवारी रोजी तिने इन्स्टाग्रामवर मेविस हर्मन नावाच्या एका कार्डियोलॉजिस्टचा प्रोफाईल फोटो बघितला जो यु के मध्ये वास्तव्यात होता. कार्डिअक रुग्ण असल्याने माझ्यावरही आजाराचे उपचार सुरू होते. त्याचसह मी लाईफ पार्टनरच्या शोधात होते असं त्या महिलेने सांगितले.
प्रेमाच्या जाळ्यात ओढलं अन् फसवणूक केली
आमच्या दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. एका पार्टनरमध्ये जे गुण हवे होते ते मला त्याच्यात आढळले. ते दोघंही एकमेकांशी जास्त वेळ बोलू लागले. त्यानंतर हर्मनने या महिलेला आजारावरील उपचाराबाबत सांगितले. काही दिवसांनी हर्मन महिलेला म्हणाला की, त्याने एक कुरिअर सरप्राईज म्हणून तिला पाठवलं आहे. त्यानंतर काही लोकांनी या महिलेला कस्टम अधिकारी बनून कॉल केला. या लोकांनी महिलेला तिला पाठवण्यात आलेल्या गिफ्ट बॉक्समध्ये ३५ हजार पाऊंडस आहेत असं सांगितले.
याबाबत महिला पुढे म्हणाली की, मी कधीही हर्मनकडून कोणत्या प्रकारच्या गिफ्टची अपेक्षा केली नव्हती. त्यानंतर दिल्ली एअरपोर्टचा अधिकारी बनून मला या लोकांनी गिफ्टबाबत धमकावण्यास सुरूवात केली. कोणत्याही प्रकारे या त्रासातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी पैशांची मागणी केली. कायदेशीर प्रक्रियेतून वाचण्यासाठी फॉरेन करेंसी कन्वर्जन चार्जेस, ट्रान्सफरींग चार्जेस म्हणून मोठी रक्कम मागितली.
जास्तीत जास्त लुटण्याचा डाव
त्यानंतर या महिलेने संबंधितांच्या खात्यावर लाखो रुपये पाठवले त्यानंतर जेव्हा हे पैसे पाठवणे बंद केले तेव्हा एका व्यक्तीनं गृहमंत्रालयातील अधिकारी असल्याचा बनाव केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे नाव घेऊन त्याने पैशांची मागणी केली. दिल्लीत लॉकडाऊन सुरु आहे. त्यामुळे या त्रासापासून वाचण्यासाठी लवकर पैसै पाठवा असं आरोपीने महिलेला सांगितले.
लाखो रुपये हडपल्यानंतर महिलेने पोलीस ठाण्यात धाव घेतली
या महिलेला तिच्यासोबत फसवणूक होत असल्याची जाणीव झाल्यानंतर ती पोलीस स्टेशनला पोहचली. तिच्या दिवंगत पतीकडून मिळालेल्या एक रक्कमेचा हिस्सा आरोपींनी लंपास केला होता. बनशंकरी पोलीस ठाण्यात या महिलेने तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी फसवणूक करणे, खंडणी यासारखे गुन्हे आरोपींविरोधात नोंद केले आहे.