डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून; श्वान पथकासह पोलीस घटनास्थळी
By उद्धव गोडसे | Updated: October 22, 2023 14:40 IST2023-10-22T14:40:12+5:302023-10-22T14:40:36+5:30
कारण अस्पष्ट, श्वान पथकाकडून संशयिताचा माग काढण्याचा प्रयत्न

डोक्यात दगड घालून वृद्धेचा निर्घृण खून; श्वान पथकासह पोलीस घटनास्थळी
उद्धव गोडसे
कोल्हापूर : सुभाषनगर येथील रोहिदास कॉलनीत राहणा-या लक्ष्मी विलास क्षीरसागर (वय ७०) यांचा अज्ञाताने डोक्यात दगड घालून निर्घण खून केला. हा प्रकार जवाहरनगर येथील चर्चच्या पाठीमागे भिंतीलगत घडला. शनिवारी (दि. २१) रात्री घडलेली घटना रविवारी (दि. २२) सकाळी दहाच्या सुमारास उघडकीस आली. खुनाचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, लक्ष्मी क्षीरसागर या मुलगा गणेश, सून मनिषा, नातू विनित आणि नात विधी यांच्यासह सुभाषनगरातील रोहिदास कॉलनीत राहत होत्या. घरीच त्या चपला तयार करण्याचे काम करीत होत्या. शनिवारी रात्री आठच्या सुमारास नातीला दांडिया खेळण्यासाठी सोडायला त्या घरातून बाहेर पडल्या. रात्री दहापर्यंत घरी परतल्या नाहीत, त्यामुळे मुलाने त्यांचा शोध सुरू केला. परिसरात शोध घेऊन अखेर रात्री साडेअकराच्या सुमारास मुलाने राजारामपुरी पोलिस स्टेशनमध्ये आई बेपत्ता असल्याची फिर्याद दिली.
रविवारी सकाळी दहाच्या सुमारास जवाहरनगरातील चर्चमधील कल्पना सोनीकर आणि सुवर्णा पोळ या दोन महिला कचरा टाकण्यासाठी मागच्या गेटने बाहेर आल्यानंतर भिंतीलगत वृद्धा पडलेली दिसली. समोरच्या मैदानात खेळत असलेल्या मुलांना याची माहिती दिल्यानंतर, त्या जवळच राहणा-या लक्ष्मी क्षीरसागर असून त्यांचा खून झाल्याचे स्पष्ट झाले. घटनास्थळी दगड, वृद्धेचे चप्पल पडले होते. जवळच असलेल्या सिमेंटच्या पाइपमध्ये एक प्लेट आणि वाटी होती. खून झाल्याचे समजताच जवाहरनगर आणि सुभाषनगरातील स्थानिकांनी गर्दी केली होती.