जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 19:59 IST2025-03-13T19:58:22+5:302025-03-13T19:59:32+5:30

सकाळी जेव्हा त्याला जाग आली. तेव्हा दुचाकीसह ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले

In Satara A thief slept under a tree, another thief robbed the thief | जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं?

जीव धोक्यात घालून घर फोडलं अन् चोरी करून 'तो' झोपला; दुसऱ्या चोराने डाव साधला, काय घडलं?

दत्ता यादव

सातारा - स्वकमाईतून कमावलेला ऐवज चोरीस गेल्यानंतर कोणालाही प्रचंड मनःस्ताप होऊ शकतो. मात्र, दुसऱ्याच्या घरातून चोरून आणून तो ऐवज जर चोरीला गेला तर यात पश्चाताप होण्यासारखं काहीच नाही. परंतु, एका अट्टल चोरट्याला मात्र, याचा प्रचंड मनःस्ताप झाला. चोरी करून तो एका झाडाखाली झोपला. याचवेळी दुसऱ्याच चोरट्याने त्याच्या ऐवजावर डल्ला मारला. ही घटना साताऱ्यातील आहे. 

सातारा शहर पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणचे पथक सिव्हिल परिसरात चार दिवसांपूर्वी गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना यादीवरील अट्टल चोरटा महेश बाबर (वय ४८, रा. किकली, ता. वाई) हा एका ठिकाणी विमनस्क अवस्थेत बसलेला दिसला. पोलिसांनी वेळ न दवडता त्याला ताब्यात घेतले. शहरात दुचाकी चोरीला जात आहेत. त्याने दुचाकी, घरफोडी कुठे केली का, याची पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी केली. त्यावेळी त्याने त्याच्याबाबतीत घडलेला एक प्रसंग पोलिसांना सांगितला. 

शहरातील एका घरात त्याने चोरी केली. त्यातील काही ऐवज त्याने चोरून आणला. चोरी करून घराबाहेर पडताना त्या घरातील दुचाकीही त्याने चोरून पलायन केले. ही चोरी त्याने मध्यरात्री केली. त्यानंतर तो जरंडेश्वर नाक्यावर गेला. एका झाडाखाली त्याने विश्रांती घेतली. मद्यसेवन केल्यामुळे त्याला गुंगी आली. तो अक्षरशः गाढ झोपी गेला. याचदरम्यान दुसरा कोणीतरी चोरटा त्याच्याजवळ आला. त्या दुचाकीला चावी आणि चोरलेला ऐवज हॅण्डलला अडकवलेला होता. तेथे आलेल्या चोरट्याने त्याच्या दुचाकीसह इतर ऐवज चोरून नेला. 

सकाळी जेव्हा त्याला जाग आली. तेव्हा दुचाकीसह ऐवज चोरीला गेल्याचे त्याच्या निदर्शनास आले. आपण रात्री जीव धोक्यात घालून घर फोडलं. ऐवजही हाती चांगला लागला. मात्र, दुसऱ्यानेच चोरून नेला, याचं मला वाईट वाटलं. असं त्यानं पोलिसांना सांगितलं.

पोलिसांकडून मनपरिवर्तनाचा प्रयत्न

हे ऐकून पोलिस चांगलेच संतापले.'अरे तू आजपर्यंत इतक्या चोऱ्या केल्या. त्या घरातल्या लोकांना त्यांचा ऐवज तू चोरून नेल्यानंतर किती वाईट वाटलं असेल. जसं तुला वाईट वाटलं ना. तशीच परिस्थिती त्यांची होत असेल. आता तरी सुधार, माणुसकी दाखवं, अशा शब्दांत पोलिसांनी त्याला इथून पुढे तरी चोरी करू नये, यासाठी त्याचे मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला.

Web Title: In Satara A thief slept under a tree, another thief robbed the thief

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.