कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 11:49 IST2025-12-26T11:49:18+5:302025-12-26T11:49:43+5:30
संपूर्ण रात्र हा प्रकार सुरू होता. पीडिता वारंवार मदतीसाठी याचना करत होती परंतु तिला सोडले नाही.

कंपनीच्या CEO चा कारनामा, आयटी मॅनेजरसोबत गँगरेप; कारच्या डॅशकॅम सगळं रेकॉर्ड झालं, मग...
उदयपूर - राजस्थानातील उदयपूर येथे एका आयटी कंपनीतील मॅनेजरसोबत घडलेल्या अतिप्रसंगामुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कारमधील गँगरेपचा हा प्रकार डॅशकॅममध्ये रेकॉर्ड झाल्याने तो पुरावा म्हणून समोर आला. २० डिसेंबरच्या रात्री एका आयटी कंपनीच्या सीईओची बर्थ डे पार्टीचं आयोजन हॉटेलमध्ये करण्यात आले होते. त्यात कंपनीच्या काही मोजक्याच जणांना आमंत्रण होते. या घटनेतील पीडित महिला जी कंपनीत मॅनेजरपदावर कार्यरत आहे तीदेखील ९ वाजता पार्टीत पोहचली होती. सगळेजण पार्टीत एन्जॉय करत होते. परंतु रात्री १.३० च्या सुमारास पीडित महिला खूप थकलेली वाटत होती. काहींनी तिला घरी सोडण्यास सांगितले परंतु तेव्हाच कंपनीतील एका महिला एक्झिक्यूटिव्ह हेडने आफ्टर पार्टीचा प्रस्ताव ठेवला, त्याला पीडित महिला नकार देऊ शकली नाही.
रात्री १.४५ च्या सुमारास पीडितेला कारमध्ये बसवले. कारमध्ये आधीपासून कंपनीचे सीईओ जयेश आणि महिला एक्झिक्यूटिव्हचा पती हजर होता. या महिलेला सुरक्षित घरी सोडण्याचा भरवसा दिला. रस्त्यात एका दुकानावर कार थांबवली, जिथे स्मोकिंगचे साहित्य घेतले. त्यानंतर कारमध्ये पीडितेलाही स्मोकिग करण्यास भाग पाडले. काही क्षणानंतर ती बेशुद्ध अवस्थेत गेली. त्यानंतर काय घडले तिलाही कळले नाही. जेव्हा महिलेला शुद्ध आली तेव्हा तिची अवस्था बदलली होती. कारच्या आत सीईओ तिच्यासोबत अश्लील कृत्य करत होता. थकवा असल्याने तिला जास्त विरोध करता आला नाही. त्यानंतर सीईओ, महिला एक्झिक्यूटिव्ह आणि तिचा पती या तिघांनी मिळून महिलेवर अतिप्रसंग केला.
संपूर्ण रात्र हा प्रकार सुरू होता. पीडिता वारंवार मदतीसाठी याचना करत होती परंतु तिला सोडले नाही. अखेर पहाटे ५ वाजता तिघांनी तिला तिच्या घराजवळ सोडले. त्याच अवस्थेत ती घरी पोहचली आणि जेव्हा तिला संपूर्ण शुद्ध आली तेव्हा शरीरावर वेदना आणि जखमा जाणवू लागल्या. कानातील एक रिंगही गायब होती, प्रायव्हेट पार्टवरही गंभीर जखमा होत्या. या घटनेने पीडितेला मोठा धक्का बसला. ज्या कारमध्ये ती बसली होती त्याला डॅशकॅम होता हे तिच्या लक्षात आले. हिंमत दाखवत तिने डॅशकॅमचे ऑडिओ व्हिडिओ पाहिले तेव्हा तिच्या अंगाचा थरकाप उडाला. संपूर्ण घटना आणि दृश्य कॅमेऱ्यात कैद झाले होते. आरोपींचे कारनामे रेकॉर्ड झाले होते. त्यानंतर या पीडितेने पोलिसांकडे धाव घेतली.
या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तातडीने पाऊले उचलली. पीडितेचा जबाब, मेडिकल रिपोर्ट आणि डॅशकॅम फुटेज यामुळे गुन्हेगारांविरोधात पुरावे पोलिसांना सापडले. मेडिकल रिपोर्टमध्ये शरीरावर जखमा, ज्यात प्राथमिकदृष्ट्या तिच्यावर गँगरेप झाल्याचे समोर आले. पोलिसांनी या पुराव्याच्या आधारे सीईओ जयेश, सहआरोपी गौरव आणि त्याची पत्नी शिल्पा यांना अटक केली. या प्रकरणी तिघांना कोर्टासमोर हजर करण्यात आले तेव्हा कोर्टाने त्यांना पोलीस कोठडी सुनावली आहे.