धक्कादायक! दहावीच्या ८ विद्यार्थ्यांविरोधात पॉक्सो गुन्हा दाखल; अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 09:55 IST2026-03-05T09:55:13+5:302026-03-05T09:55:13+5:30
पीडितांच्या जबाबानुसार मागील ६ ते ७ महिन्यापासून त्यांच्यासोबत असे प्रकार सुरू होते.

धक्कादायक! दहावीच्या ८ विद्यार्थ्यांविरोधात पॉक्सो गुन्हा दाखल; अनैसर्गिक अत्याचाराचा आरोप
नाशिक - शहरातील एका हॉस्टेलमध्ये धक्कादायक प्रकार घडला आहे. याठिकाणी दहावीच्या वर्गात शिकणाऱ्या ८ विद्यार्थ्यांविरोधात ग्रामीण पोलीस ठाण्यात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या मुलांवर ५ आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांवर अनैसर्गिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पालकांच्या तक्रारीवरून या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
नाशिक जिल्ह्यातील एका हॉस्टेलमध्ये ही घटना घडली. याठिकाणी १० वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांकडून ५ वी आणि ६ वीच्या विद्यार्थ्यांचे रॅगिंग केले जायचे. त्यात या मुलांवर अनैसर्गिक अत्याचारही करण्यात आले. मंगळवारी या प्रकरणात पालकांनी पोलीस स्टेशन गाठत तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केला. तिथे रॅगिंगच्या नावाखाली मुलांवर अनैसर्गिक अत्याचार झाल्याचे आढळले.
पीडितांच्या जबाबानुसार, मागील ६ ते ७ महिन्यापासून त्यांच्यासोबत असे प्रकार सुरू होते. २२ फेब्रुवारीला या प्रकाराबाबत हॉस्टेल सुप्रीटेंडेंट यांच्याकडेही तक्रार केली. त्यानंतर हॉस्टेल सुप्रीटेंडेंट यांनी आरोपी १० विद्यार्थ्यांच्या पालकांशी संपर्क साधला आणि त्यांना या मुलांना घरी नेण्यास सांगितले. यावेळी पीडितांच्या पालकांनाही बोलवण्यात आले होते. त्यानंतर एका पीडितेच्या पालकांनी मंगळवारी १० वीच्या आरोपी विद्यार्थ्यांविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दिली. तेव्हा हा प्रकार समोर आला. TOI ने हे वृत्त दिले आहे.
दरम्यान, पोलिसांनी या प्रकाराची गंभीर दखल घेत आरोपी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले. या मुलांना जुवेनाईल कोर्टासमोर हजर केले जाईल. सोबतच हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केल्याबद्दल सुप्रीटेंडेंट आणि ३ कर्मचाऱ्यांविरोधातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुलांवरील अत्याचाराचे प्रकार कळल्यानंतरही या कर्मचाऱ्यांनी आणि हॉस्टेल सुप्रीटेंडेंट यांनी पोलिसांना कळवले नसल्याचा आरोप आहे. या हॉस्टेलमध्ये ६० विद्यार्थी राहण्याची क्षमता आहे परंतु सध्या इथे ४८ विद्यार्थी राहत होते.