रिवा - प्रेमात एका प्रियकरावर कंगाल होण्याची वेळ आली आहे. प्रेयसीनं डायमंड, आयफोन, महागडी घड्याळे, हँडबॅग, सँडल अन् भरभरून ऑनलाईन शॉपिंग केली. ३ वर्षाच्या अफेअर काळात प्रियकर प्रेयसीसोबत लग्नाची स्वप्ने पाहत होता. मात्र ८० लाख किंमतीच्या भेट घेऊन प्रेयसीने प्रियकराला गुलीगत धोका दिला. प्रेयसीने तिच्या जुन्या प्रियकरासोबत लग्न केले त्यानंतर विश्वासघात झालेल्या प्रियकराने थेट पोलीस स्टेशन गाठत तिची तक्रार केली. या प्रेयसीवर पोलिसांनी ४२० चा गुन्हा दाखल केल्यापासून प्रेयसी फरार झाली आहे.
रिवा शहरच्या आझाद नगर इथल्या विवेक शुक्लाचा आस्था उर्मलिया नावाच्या युवतीवर जीव जडला. विवेकवर आस्थाच्या प्रेमाची चादर होती. त्यामुळे खिशा मोकळा करत विवेकने प्रेयसीवर भरमसाठ खर्च करायला सुरुवात केली. महागड्या हॉटेलमध्ये जेवण, ऑनलाईन शॉपिंगसह लाखो रुपयांचं गिफ्ट देणे प्रियकराच्या अंगलट आलं आहे. आस्थानेही विवेकच्या प्रेमाचा फायदा घेत स्वत:साठी आणि तिच्या बहिणींसाठीही बरीच खरेदी केली होती. आस्था कायम ऑनलाईन शॉपिंग करायची आणि त्याचे बिल विवेक भरायचा.
विवेक शुक्लाने आरोप केलाय की, लग्नाचं स्वप्न दाखवून ३ वर्ष ६ महिने आस्थाने जवळपास ४५ लाखांची शॉपिंग केली. इतकेच नाही तर तिला डायमंडची अंगठी, आयफोन, हँडबॅग, चष्मा, कपडे आणि लाखो रुपयांच्या भेटवस्तू दिल्या असं त्याने सांगितले. ३ वर्षापूर्वी आस्था आणि विवेकची भेट झाली होती. त्यानंतर दोघांमध्ये मैत्री झाली आणि मैत्रीचं रूपांतर प्रेमात झाले. आस्थाच्या कुटुंबालाही विवेकबाबत माहिती होते. कुटुंबानेही लग्नाचं आश्वासन विवेकला दिले मात्र आता विवेकला बाजूला करत आस्थानं तिच्या जुन्या प्रियकरासोबत साखरपुडा केला आहे.
दरम्यान, प्रेयसी आस्था हिच्या कुटुंबाची राजकीय पार्श्वभूमी आहे. तिचे मामा माजी आमदार आहेत तर वडील एका पक्षाचे अध्यक्ष आहेत. या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल करून प्रेयसीवर ४२० कलम लावले आहे. ऑनलाईन शॉपिंग आणि महागडे गिफ्ट यातून प्रेयसीने जवळपास ८० लाख प्रियकराकडून घेतले आहेत. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत असं पोलीस अधीक्षक रितू उपाध्याय यांनी सांगितले.