जुहू किनाऱ्यावरील ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंध उघड, पत्नीच्या प्रियकराने संपवले
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2026 07:08 IST2026-02-11T07:07:55+5:302026-02-11T07:08:12+5:30
जीवरक्षकांच्या मदतीने ती उघडताच त्यात अर्धवट कुजलेला, शिर नसलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.

जुहू किनाऱ्यावरील ‘त्या’ मृतदेहाचे गूढ उकलले; विवाहबाह्य संबंध उघड, पत्नीच्या प्रियकराने संपवले
मुंबई - जुहू किनाऱ्यावर सोमवारी शिर नसलेल्या मृतदेहामुळे परिसरात खळबळ माजली होती. सांताक्रूझ पोलिसांनी या घटनेचा केवळ १२ तासांत उलगडा केला. विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचे उघड केले. अशोक गौड असे मृत तरुणाचे नाव असून, त्याची हत्या पत्नीच्या प्रियकराने केल्याचे तपासात स्पष्ट झाले.
हत्येप्रकरणी पोलिसांनी वाहिद अली शेख ऊर्फ मिट्टू (वय ३०, रा. मालवणी) याला मंगळवारी अटक केली. अशोक हा विवाहबाह्य संबंधांमध्ये अडसर ठरत असल्याने त्याची हत्या केल्याची कबुली आरोपीने दिल्याचा दावा पोलिसांनी केला. समुद्र किनाऱ्यावर गस्त घालणाऱ्या पथकाला सोमवारी समुद्रात वाहून आलेली एक संशयास्पद गोणी आढळून आली. जीवरक्षकांच्या मदतीने ती उघडताच त्यात अर्धवट कुजलेला, शिर नसलेला मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत, उत्तरीय तपासणीसाठी पाठवला.
चार दिवसांपासून बेपत्ता
बेपत्ता व्यक्तींच्या नोंदी तपासत असताना मालवणी परिसरातून चार दिवसांपासून बेपत्ता असलेल्या अशोक गौडची माहिती समोर आली. हाच धागा पकडून तपास सुरू केला. चौकशीदरम्यान स्थानिक नागरिकांनी अशोकला शेवटचे आरोपी वाहिदसोबत पाहिल्याची माहिती दिली. चौकशीत अशोकच्या पत्नीचे वाहिदसोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. वाहिदने गुन्ह्याची कबुली दिली. वाहिदचा मालवणीत गारमेंट व्यवसाय आहे. रविवारी रात्री त्याने अशोकला दारू पाजली. नशेत असलेल्या अशोकची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केले व ते गोणीत भरून समुद्रात फेकल्याचे तपासात उघड झाले आहे.