म्हणतात ना, प्रेमाला वयाचं बंधन नसतं... पण हेच प्रेम जेव्हा पन्नाशीत उफाळून येतं आणि हातात 'कट्टा' घेऊन प्रेयसीच्या दारात उभं राहतं, तेव्हा काय होतं याचा प्रत्यय उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये आला आहे. एका ५० वर्षांच्या विवाहित व्यक्तीला आपल्या १५ वर्षे जुन्या प्रेमाची आठवण आली. प्रेयसीने बोलणं बंद केल्याच्या रागातून हा महाशय चक्क तिच्या माहेरी पिस्तूल घेऊन पोहोचला. मात्र, जेव्हा पोलिसांनी त्याला पकडले, तेव्हा जे सत्य समोर आले ते ऐकून पोलीसही चक्रावून गेले.
१५ वर्षांचे प्रेम आणि अचानक आलेला दुरावा
बरेलीच्या प्रेमनगर भागात राहणाऱ्या या ५० वर्षीय व्यक्तीचे एका महिलेशी गेल्या १५ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही विवाहित असून त्यांची मुलं आता मोठी झाली आहेत. मात्र, गेल्या काही काळापासून सामाजिक बदनामी आणि कुटुंबाच्या भीतीने महिलेने या व्यक्तीशी असलेले संबंध तोडले होते. तिने त्याचे फोन उचलणेही बंद केले होते. याच गोष्टीचा राग मनात धरून प्रियकराने टोकाचे पाऊल उचलले.
माहेरी जाऊन घातला राडा, प्रेयसीने फिरवला पोलिसांना फोन
प्रेयसीने बोलणं टाळल्यामुळे हा प्रियकर संतापला आणि थेट तिच्या माहेरी जाऊन थडकला. तिथे त्याने तिच्या घराबाहेर उभे राहून तिला धमकावण्यास सुरुवात केली. त्याच्या हातात गावठी कट्ट्यासारखं दिसणारं शस्त्र पाहून महिला आणि तिचे कुटुंबीय प्रचंड घाबरले. क्षणाचाही विलंब न लावता महिलेने पोलिसांना फोन करून मदतीसाठी बोलावले.
पोलिसांच्या एन्ट्रीनंतर फुटला घाम; पण..
प्रेमनगर पोलीस ठाण्याचे चौकी प्रभारी सरताज सैफी आपल्या टीमसह तातडीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी त्या ५० वर्षांच्या आशिकाला ताब्यात घेतले आणि त्याच्या हातातील तो तथाकथित कट्टा जप्त केला. पण जेव्हा पोलिसांनी त्याची तपासणी केली, तेव्हा सर्वांनाच हसू फुटले. तो कोणताही खरा कट्टा नसून, हुबेहूब कट्ट्यासारखा दिसणारा लायटर होता. प्रेयसीला घाबरवण्यासाठी त्याने या बनावट शस्त्राचा वापर केला होता.
मध्यरात्रीपर्यंत रंगली पंचायत
दोन्ही पक्ष विवाहित असल्यामुळे आणि त्यांची मुलं मोठी झाल्यामुळे हे प्रकरण कुटुंबासाठी अत्यंत मानहानीकारक ठरले आहे. रात्रभर पोलीस ठाण्यात दोन्ही कुटुंबांची पंचायत सुरू होती. दोन्ही बाजूंच्या मुलांनी आणि नातेवाईकांनी या प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला. शेवटी पोलिसांनी आरोपीला चांगलंच समजावलं आणि शांतता भंग केल्याप्रकरणी त्याच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू केली.
Web Summary : In Uttar Pradesh, a 50-year-old man, enraged by his ex-lover's rejection, brandished a lighter resembling a pistol at her home. Police intervened, revealing the weapon's true nature. Family drama ensued, leading to police action for disturbing the peace.
Web Summary : उत्तर प्रदेश में, एक 50 वर्षीय व्यक्ति, अपनी पूर्व प्रेमिका के इनकार से नाराज़ होकर, उसके घर पर पिस्तौल जैसा दिखने वाला लाइटर लेकर पहुँच गया। पुलिस ने हस्तक्षेप किया और हथियार का असली रूप सामने आया। पारिवारिक नाटक हुआ, जिसके बाद शांति भंग करने के लिए पुलिस ने कार्रवाई की।