अबब! एका झोपडीत पोलिसांच्या हाती लागला खजिना; पैसे मोजायला मशीन मागवली, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 19:22 IST2023-06-16T19:22:08+5:302023-06-16T19:22:32+5:30
या तपासात पोलिसांना ड्रग्स अथवा गांजा काही सापडले नाही. परंतु झोपडपट्टीतील २-३ घरात चांदीचे दागिने हाती लागले.

अबब! एका झोपडीत पोलिसांच्या हाती लागला खजिना; पैसे मोजायला मशीन मागवली, मग...
नवी दिल्ली - राजधानी दिल्लीहून जवळच असलेल्या गुरुग्राम येथील बसई रोडशेजारी बनलेल्या झोपडपट्टीवर पोलिसांनी छापेमारी केली. यावेळी पोलिसांच्या हाती असं काही लागले जे पाहून सर्वच हैराण झाले. या झोपडपट्टीतून अवैधरित्या ड्रग्स विकले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचत याठिकाणी धाड टाकली. त्यावेळी पोलिसांना ड्रग्स, गांजा काही सापडले नाही परंतु एका झोपडीत पोलिसांना मोठा खजिना हाती लागला.
झोपडपट्टीतील एका घरात पोलिसांना बॅग आढळली. ही बॅग पोलिसांनी उघडली असता त्यात तब्बल ४ किलो ३७० ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि १२ लाख ८० हजार रोकड सापडली. शुक्रवारी हे प्रकरण उघडकीस आले. सेक्टर १० मधील परिसरात एका खासगी शाळेजवळील झोपडपट्टीत काही लोक अवैधपणे नशेचे पदार्थ विकतात अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी परवानगी घेऊन संबंधित परिसरात छापेमारी केली.
या तपासात पोलिसांना ड्रग्स अथवा गांजा काही सापडले नाही. परंतु झोपडपट्टीतील २-३ घरात चांदीचे दागिने हाती लागले. एका झोपडीत सापडलेल्या बॅगेत पोलिसांना ५००, २००, १०० आणि ५० च्या नोटांनी भरलेले दिसले. चांदीच्या दागिन्यांचे वजन केले असता ते ४ किलो ३७० ग्रॅम असल्याचे आढळले. त्यानंतर नोटा मोजण्याच्या मशीनने पैसे मोजले असता १२ लाख ८० हजार रोकड सापडली.
पोलिसांचा तपास सुरू
पोलीस अधिकारी सुभाष बोकन म्हणाले की, सीआरपीसी कलम १०२ अंतर्गत कॅश आणि दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत. आता संबंधितांना नोटीस देऊन इतक्या मोठ्या प्रमाणात रोकड आणि दागिने कुठून आणले याची चौकशी पोलीस करत आहेत. संबंधितांनी उत्तर दिल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल असं त्यांनी म्हटलं.