धुळे - देवपुरातील एका तृतीयपंथीवर चौघांनी लैंगिक अत्याचार करत त्याची व्हिडिओ शूटिंगसह अंगावरील लाखाचे दागिने बळजबरीने काढून घेतले. काढलेला व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देत पीडित तृतीयपंथीकडून १ लाखांची खंडणी मागितली. रविवारी रात्री अकरा ते साडे अकराच्या सुमारास चाळीसगावच्या चौफुलीजवळ ही घटना घडली. या प्रकरणी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात चौघांविरुद्ध लैंगिक अत्याचारासह खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी रात्री चाळीसगाव रोड परिसरातील संशयित तिघा तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तृतीयपंथी पीडिताने दिलेल्या फिर्यादीनुसार, रविवारी ४ मे रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास चाळीसगाव रोडच्या चौफुली महामार्गालगत असलेल्या एका ठिकाणी पीडितेचा विश्वास संपादन करून तिला घेऊन गेले. त्यानंतर पीडित तृतीयपंथीवर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. त्याचे व्हिडिओ देखील तयार केले.
अंगावरील १ लाखांचे सोन्याचे दागिने हिसकावले
चौघांनी लैंगिक अत्याचार करत त्याची मोबाईलमध्ये रेकॉर्डिंग केली. त्यानंतर पीडितेला मारहाण करण्यात आली. तिच्या अंगावरील सुमारे १ लाख किंमतीचे सोन्याचे दागिने बळजबरीने काढून घेतले. मारहाण करून लैंगिक अत्याचार काढलेले अश्लील व्हिडिओ प्रसारित करण्याची धमकी देऊन पीडितेकडून चौघांनी १ लाखाची खंडणी मागितली. त्यानंतर चौघे तिथून निघून गेले.
दरम्यान, पीडित तृतीयपंथीने या प्रकारानंतर चाळीसगाव रोड पोलिस स्टेशन गाठले. पोलिसांना आपबिती सांगितली, तिने दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी ४ जणांविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला. सोमवारी रात्री चौघांपैकी तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.