रक्तरंजित प्रेम प्रकरण! २ दिवसांपूर्वी खाकी अंगावर चढवली अन् तिसऱ्या दिवशी बापाच्या खूनात अडकली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 00:02 IST2026-03-28T00:02:16+5:302026-03-28T00:02:56+5:30
या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार आणि चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे.

रक्तरंजित प्रेम प्रकरण! २ दिवसांपूर्वी खाकी अंगावर चढवली अन् तिसऱ्या दिवशी बापाच्या खूनात अडकली
परिमल डोहणे
चंद्रपूर - प्रेमसंबंधाला विरोध करणाऱ्या पित्याची विष देऊन हत्या केल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा तपास आता तांत्रिक वळणावर आला आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी आशिष शेडमाके आणि आर्या बाल्लावार या दोघांचेही व्हॉईस सॅम्पल्स पोलिसांकडून घेण्यात आले असून ते नागपूर येथील न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींचे मोबाईल फोन आधीच जप्त केले आहेत. तीन वर्षांपूर्वी रचलेला हा कट आणि त्यादरम्यान झालेली संभाषणे यांचे धागेदोरे मिळवण्यासाठी हे व्हॉईस सॅम्पलिंग अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे. आरोपींनी एकमेकांशी केलेल्या संवादाची पुष्टी करण्यासाठी प्रयोगशाळेचा अहवाल या खटल्यात मुख्य पुरावा ठरू शकतो.
शवविच्छेदन अहवाल आणि 'व्हिसेरा'वर मदार
मृत जयंत बाल्लावार यांच्या शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे नेमके कारण काय होते, याबाबतही पोलीस तपास करीत आहेत. त्यामुळे पोलिसांनी आता रासायनिक विश्लेषणाद्वारे विषबाधेची पुष्टी करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.
तिन्ही आरोपींना एक दिवसाचा पीसीआर
या प्रकरणात पोलिसांनी प्रियकर कॉन्स्टेबल आशिष महेश शेडमाके, कॉन्स्टेबल मुलगी आर्या जयंत बाल्लावार आणि चैतन्य ऊर्फ मोंटी सचिन गेडाम या तिघांना अटक केली आहे. तिघांनाही पोलिसांनी शुक्रवारी न्यायालयात हजर केले असता, न्यायाधीशांनी एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली असल्याची माहिती एसडीपीओ प्रमोद चोगुले यांनी दिली.
दोघांचेही खाकी सेवेचे स्वप्न अर्धवट
कॉन्स्टेबल आशिष शेडमाके नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्याची दोन-तीन वादग्रस्त प्रकरणे पुढे आली. त्यामुळे पोलीस अधीक्षकांनी त्याला बडतर्फ केले होते. मात्र आता तो पुन्हा लवकरच रुजू होणार होता. त्यातच हे प्रकरण पुढे आले. तर कॉन्स्टेबल आर्या जयंत बाल्लावार हिने २३ मार्च २०२६ रोजी पासिंग आऊट परेड पूर्ण केली होती. मात्र दोन दिवसांनंतर हत्येचे प्रकरण पुढे आल्याने तिच्या खाकी वर्दीचे स्वप्न अर्धवटच राहिले आहे