चालत्या ट्रेनमध्ये भरदिवसा हत्या; युवकाच्या डोक्यात गोळी झाडून आरोपी पळून गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 20:15 IST2025-01-21T20:15:16+5:302025-01-21T20:15:48+5:30
गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली.

चालत्या ट्रेनमध्ये भरदिवसा हत्या; युवकाच्या डोक्यात गोळी झाडून आरोपी पळून गेले
लखीसराय - बिहारमध्ये चालत्या ट्रेनमध्ये एकाची गोळी मारून हत्या करण्यात आली आहे. या घटनेने रेल्वे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण आहे. लखीसराय येथे एका युवकाची गया हावडा एक्सप्रेसमध्ये गोळी मारून हत्या केली. ही घटना किऊल रेल्वे स्टेशनजवळ घडली. मृत युवकाचं नाव धर्मेंद्र साह असं आहे. जो लखीसरायच्या महिसोना गावातील रहिवासी होता. ३-४ आरोपींनी ट्रेनमध्ये चढून धर्मेंद्रला गोळी झाडली त्यानंतर चेन खेचून पळून गेले. सुरुवातीच्या पोलीस तपासात जमीन वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
गया हावडा एक्सप्रेस किऊल रेल्वे स्टेशनवरून पुढे निघाली तेव्हा ट्रेनमधून प्रवास करणाऱ्या धर्मेंद्र साहवर अचानक गोळीबारी झाली. ३-४ गुन्हेगार आधीच ट्रेनमध्ये दबा धरून बसले होते. या लोकांनी ठरवून धर्मेंद्रवर गोळीबार केला. गोळी लागल्याने धर्मेंद्रचा जागीच मृत्यू झाला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे रेल्वे प्रवासी घाबरले. ट्रेनमध्ये गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. गुन्हेगारांनी धर्मेंद्रवर गोळीबार करत ट्रेनमधील साखळी ओढली. त्यानंतर ट्रेन थांबताच ते आरोपी फरार झाले.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी मृत धर्मेंद्र साह याची ओळख पटवली. धर्मेंद्र हे लखीसरायच्या महिसोना गावचा रहिवासी होता. त्याच्याकडे सापडलेल्या ओळखपत्र आणि इतर कागदपत्रांवरून हे उघडकीस आले. पोलिसांनी सांगितले की, मृतकाजवळ सापडलेली कागदपत्रे जमिनीच्या वादाशी संबंधित आहेत. सुरुवातीच्या तपासानुसार, जमिनीच्या वादातून धर्मेंद्रची हत्या झाली असावी असा पोलिसांना संशय आहे. या प्रकरणातील सर्व पैलूंचा पोलीस तपास करत आहेत. ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या इतर प्रवाशांचीही चौकशी करण्यात आली.
दरम्यान, गया-हावडा एक्सप्रेसमध्ये एका तरुणाची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. किऊल-भागलपूर रेल्वे मार्गावरील सिग्नलजवळ ही घटना घडली. ट्रेन किऊल स्टेशनवरून निघताच पुढील सिग्नलजवळ गुन्हेगारांनी तरुणाच्या डोक्यात गोळी झाडली आणि साखली ओढून चालत्या ट्रेनमधून उडी मारून पळून गेले. या घटनेनंतर प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला