मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2025 08:42 IST2025-12-13T08:41:00+5:302025-12-13T08:42:03+5:30
ही हत्या नैसर्गिक घटना असल्याचे भासवून तीन वर्ष उलटल्यानंतर पोलिसांच्या तपासामुळे वेगळे वळण मिळाले आहे.

मित्रांकडून मागवला विषारी साप, सर्पदंशाने पत्नीची केली हत्या; ३ वर्षांनी झाला उलगडा, पतीला अटक
पंकज पाटील
बदलापूर - बदलापूर पूर्वेतील एका इमारतीत १० जुलै २०२२ रोजी एका महिलेचा सर्पदंशाने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र या घटनेची अधिक चौकशी केली असताना ही नैसर्गिक घटना नव्हे तर हत्येचा कट असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मृत महिलेच्या पतीसह त्याच्या तीन मित्रांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही हत्या नैसर्गिक घटना असल्याचे भासवून तीन वर्ष उलटल्यानंतर पोलिसांच्या तपासामुळे वेगळे वळण मिळाले आहे. बदलापूर पूर्वेतील उज्ज्वलदीप अपार्टमेंट येथे निरजा आंबेरकर या त्यांच्या पतीसोबत राहत होता. त्यांना १० जुलै २०२२ रोजी सर्पदंश झाल्याने त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंदही करण्यात आली होती. मात्र पोलिसांच्या तपासाने चक्रे फिरली आणि ही हत्या असल्याचे उघडकीस आले.
निरजा आंबेरकर यांच्या मृत्यूप्रकरणात सुरू असलेल्या तपासात आरोपी ऋषीकेश चाळके याने स्वखुशीने एक निवेदन दिले. तसेच त्याबाबत गुन्हयाच्या ठिकाणी प्रात्यक्षिक करून दाखविले. सोबतच साक्षीदार हरिश घाडगे आणि दिपक वाघमारे यांनी याप्रकरणात जबाब दिले. यावरून आरोपीत ऋषीकेश चाळके, चेतन दुधाने, कुणाल चौधरी आणि पती रूपेश आंबेरकर यांनी आपसात कट रचला आणि निरजा रूपेश आंबेरकर यांना सर्पदंश करून जीवे ठार मारले असल्याची पोलिसांची खात्री झाली. त्यामुळे अकस्मात मृत्यूची खोटी माहिती देऊन गुन्ह्यातील पुरावे नष्ट केले आणि हत्येप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.