Deoria case: एका शेतात एक बेवारस ट्रॉली बॅग आढळून आली. जास्त सामान घेऊन जाण्यासाठी वापरतात ती मोठ्या आकारातील. त्यामुळे शेतकऱ्याचे लक्ष त्या बॅगने वेधून घेतले. उत्सुकता चाळवली गेली, पण भीतीही होती. त्यामुळे शेतकऱ्याने लगेच याची माहिती पोलिसांना दिली. पोलीस आले आणि बॅग उघडली. बॅग उघडताच त्यांना दरदरून घामच फुटला; कारण त्या बॅगेत होता मृतदेह! एका व्यक्तीच्या मृतदेहाचे दोन तुकडे करून ते बॅगमध्ये भरलेले होते. पण, हा मृतदेह कुणाचा हे काही कळत नव्हतं. अखेर पोलिसांना एक धागा सापडला आणि हत्येचे गूढ उकलले. तो धागा होता बॅगवर असलेला बारकोड!
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मेरठच्या सौरभच्या हत्येची आठवण करून देणारी ही घटना घडली आहे उत्तर प्रदेशमध्ये. देवरिया जिल्ह्यातील तरकुलवा ठाणे हद्दीत ही बॅग सापडली. गहू काढण्यासाठी शेतकरी शेतात पोहोचला. त्यावेळी त्याला ही ट्रॉली बॅग दिसली. त्याने परिसरात आजूबाजूला बघितले. कुणीच नव्हते. पण, बॅग गच्च भरलेली असल्याचे दिसले आणि त्याला शंका आली.
बॅगेमध्ये दोन तुकड्यांमध्ये होता मृतदेह
माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. बॅग उघडल्यानंतर पोलिसांना आतमध्ये ३५ ते ३७ वर्ष वय असलेल्या एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. पण, हत्या करण्यात आलेली व्यक्ती कोण? असा पहिलाच प्रश्न पोलिसांसमोर होता आणि त्या दृष्टीने तपास सुरू झाला.
बारकोडने पोलिसांना केली मदत
पोलिसांनी परिसरात पुरावा शोधण्याचा प्रयत्न केला, पण काहीच मिळाले नाही. पोलिसांनी ट्रॉली बॅग व्यवस्थित बघितली आणि एक धागा सापडला. बॅगवरती एक बारकोड होता. विमान प्रवास करताना बॅगवर असतो, तो. हा बारकोड हैदराबादवरून वाराणसीला विमानाने प्रवास केल्याचा होता.
पोलिसांनी वाराणसी विमानतळ प्रशासनासोबत संपर्क केला आणि याबद्दल माहिती घेतली. पोलिसांना व्यक्तीचा ओळख पटवण्यात अखेर यश आले. ही बॅग होती भटोली गावात राहणाऱ्या नौशादची. माहिती मिळताच पोलीस भटौली गावातील नौशादच्या घरी पोहोचले.
गावात राहणाऱ्या भाच्यासोबतच होते पत्नीचे अनैतिक संबंध
३७ वर्षीय नौशाद सौदी अरेबियात नोकरी करायचा. काही दिवसांपूर्वीच तो गावी आला होता. गावी आल्यानंतर त्याची हत्या झाली होती. पोलिसांनी चौकशी केली आणि सगळं प्रकरण समोर आले. नौशाद आणि रजियाचे लग्न झाले होते. त्यांना एक ९ वर्षांची मुलगी आहे. पण, नौशाद सौदी असताना रजियाचे गावात राहणाऱ्या भाच्यासोबतच अनैतिक संबंध सुरू होते.
अशी केली पतीची हत्या
नौशाद गावी आला, तेव्हा रजियाने तिचा बॉयफ्रेंड रोमान आणि त्याचा मित्र हिमांशू यांच्यासोबत हत्येचा कट रचला. रजियाने आधी नौशादला नशेचा पदार्थ खाऊ घातला. त्याची शुद्ध हरपल्यानंतर तिघांनी मिळून धारदार शस्त्राने त्याची हत्या केली.
नौशादच्या मृतदेहाचे दोन तुकडे केले. त्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी हत्येत वापरलेले शस्त्र फेकले. रक्ताचे डाग पुसले आणि नौशादच मृतदेह ट्रॉलीमध्ये भरला. हिमांशूच्या गाडीतून तिघेही ट्रॉली बॅग घेऊन भटौलीपासून ६० किमी अंतरावर गेले आणि एका शेतात ती फेकली. अखेर बारकोडमुळे हत्येचे बिंग फुटले. पोलिसांनी रजियाला अटक केली आहे, तर इतर दोन्ही आरोपी अद्याप फरार आहेत.