Video: महाकुंभमुळे चर्चेत आलेल्या 'IIT वाले बाबा'ला बेदम चोपलं?; डिबेट शोवेळी राडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 10:44 IST2025-03-01T10:43:21+5:302025-03-01T10:44:17+5:30
IIT Baba Attack in Noida: अभय सिंह हे मूळ हरियाणाचे रहिवासी असून, त्यांनी IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे

Video: महाकुंभमुळे चर्चेत आलेल्या 'IIT वाले बाबा'ला बेदम चोपलं?; डिबेट शोवेळी राडा
Attack On IIT Baba: महाकुंभ मेळ्यामुळे देशभरात चर्चेत आलेल्या आयआयटीवाले बाबा अभय सिंह यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. नोएडा येथील एका न्यूज चॅनेलच्या डिबेट शोवेळी अभय सिंहला मारहाण झाल्याचा प्रकार घडला. याबाबत अभय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली असून काही भगवाधारी वस्त्र घालून आलेल्या लोकांनी मला मारलं, त्यानंतर एका खोलीत बंद केले असा आरोप केला आहे. या प्रकारानंतर आयआयटीवाले बाबा सेक्टर २६ च्या पोलीस चौकीबाहेर आंदोलनास बसले होते.
पोलिसांनी समजवल्यानंतर आयआयटीवाले बाबा (IIT Baba Mahakumbh) यांनी त्यांचे आंदोलन मागे घेतले. एका खासगी चॅनेलच्या डिबेट शोमध्ये सहभाग घेण्यासाठी अभय सिंह आले होते. त्याठिकाणी काही साधू संतही होते. न्यूज नेशन चॅनेलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यात अभय सिंह बाबा कुणासोबत तरी व्हिडिओ कॉलवर बोलत जाताना दिसतात. आयआयटी बाबाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह करत या घटनेची माहिती दिली. आधी मला मारलं, त्यानंतर खोलीत बंद केले असा आरोप त्यांनी केला.
भगवे कपडे घातलेल्या लोकांनी केली मारहाण
IIT बाबाने इन्स्टाग्रामवर लाईव्ह सांगितले की, मला डिबेटसाठी बोलवण्यात आले होते. त्यावेळी बाहेरून काही भगवे कपडे घातलेले लोक न्यूजरूममध्ये आले आणि त्यांना मला मारहाण केली. एका व्यक्तीने मला दांडक्याने मारले. त्यानंतर मला जबरदस्तीने एका खोलीत बंद केले होते. मी कसंबसं तिथून वाचून बाहेर पडलो असं अभय सिंह यांनी सांगितले.
नोएडा के न्यूज नेशन मीडिया रूम में IIT बाबा और बाकी बाबाओं के बीच क्या हुआ, ये पूरा Video देखिए... pic.twitter.com/fW7RpAskDz
— Sachin Gupta (@SachinGuptaUP) February 28, 2025
आखाड्यातून IIT वाले बाबाला काढले
गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्यासोबत आयआयटी बाबा महाकुंभला गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी गुरू महंत सोमेश्वर पुरी यांच्याविरोधात सोशल मीडियात आक्षेपार्ह भाषेचा वापर केला. त्यानंतर महाकुंभमधील जुना आखाड्यात त्यांना प्रवेश बंदी केली. अभय सिंह शिक्षित मनोरूग्ण असल्याचं आखाड्याच्या प्रवत्यांनी सांगितले होते.
कोण आहे अभय सिंह उर्फ आयआयटी बाबा?
अभय सिंह हे मूळ हरियाणाचे रहिवासी असून, त्यांनी IIT मुंबईतून एरोस्पेस इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. शिक्षण झाल्यानंतर त्यांनी काही काळ कॅनडात लाखो रुपये पगाराची नोकरी केली. यादरम्यान त्यांनी फोटोग्राफी शिकली आणि त्यातही काही काळ काम केले. फोटोग्राफीसाठी देशभर फिरताना ते आध्यात्माकडे ओढले गेले. यानंतर त्यांनी घरदार सोडून संन्यासी जीवन जगण्याचे ठरवले. अलीकडेच पाकिस्तान आणि भारत यांच्या चॅम्पियन ट्रॉफीतील सामन्यात पाकिस्तान जिंकणार असं विधान करून अभय सिंह चर्चेत आले होते. त्यानंतर या सामन्यात भारताचा विजय झाल्यानंतर सोशल मीडियात आयआयटी बाबा ट्रोल झाले होते.