ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

By संदीप प्रधान | Published: December 18, 2023 08:51 AM2023-12-18T08:51:23+5:302023-12-18T08:51:34+5:30

नआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल. 

If there is a riot like that in Thane, Dembivli... | ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

ठाणे, डाेंबिवलीत तसा गाेळीबार झाला तर...

- संदीप प्रधान, वरिष्ठ सहायक संपादक

भिवंडीलगतच्या पडघा बोरीवली या छोट्याशा पाच हजार लोकवस्तीच्या गावात आयसिस टेरर मॉड्युल उभारण्याचा प्रयत्न करीत होते, अशी अत्यंत धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणांच्या (एनआयए) हाती लागली आहे. साकिब नाचन व त्याच्यासह १५ जणांना एनआयएचे अधिकारी मागील आठवड्याच्या अखेरीस ताब्यात घेऊन गेले. पडघा गावाचे रूपांतर ‘मुक्त क्षेत्र’ करून तेथे देशभरातून जिहादी तरुणांना आणून दहशतवादी प्रशिक्षण देण्याचा हेतू होता. पडघ्याचे रुपांतर हे सिरीयात करण्याची योजना होती, असे स्फोटक खुलासे चौकशीअंती झाले आहेत. मुंबईवर २६ नोव्हेंबर २००८ रोजी पाकिस्तानातील दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. दहा अतिरेकी हातात एके-४७ घेऊन अंदाधुंद गोळीबार करीत फिरत होते. ठाणे, डोंबिवली, कल्याण, बदलापूर, अंबरनाथ अशा सकाळी व सायंकाळी अत्यंत गर्दीच्या रेल्वे स्थानकांच्या परिसरात कसाब व त्याच्या साथीदारांनी केला तसा हल्ला केला गेला, तर किती मोठा हाहाकार उडेल, याची कल्पनाही करवत नाही.

एनआयएने मोठ्या फौजफाट्यासह साकिब नाचनला जेरबंद केले. त्याच्या मुलाला ऑगस्ट महिन्यात एनआयएने अटक केली होती. नाचन व त्याचा पुत्र यांच्या एनआयने मुसक्या आवळल्या म्हणजे धोका संपला, अशा बेफिकिरीत राहणे चूक ठरेल. 

महंमद अजमल कसाब हा अतिरेकी जिवंत पोलिसांच्या हाती सापडल्याने पाकिस्तानचा बुरखा टराटरा फाटला. त्यानंतर गेल्या १५ वर्षांत सुदैवाने मोठा अतिरेकी हल्ला झालेला नाही. त्यामुळे लोकांमध्ये बेफिकिरी आली आहे. पडघ्यात आयसिसकडून शिजत असलेले कटकारस्थान भयंकर आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये अतिरेकी प्रशिक्षित करून त्यांना भारतात धाडण्यातील धोका २००८ मध्ये लक्षात आल्याने आता नाचनसारख्या अतिरेकी कारवायांकरिता वेळोवेळी तुरुंगवास भोगलेल्यांना हाताशी धरून भिवंडीजवळच टेरर मॉड्युल उभारण्याचे पाकिस्तानमधील गुप्तचर यंत्रणा व लष्कराने ठरवले असू शकते.

मुस्लीम समाजातील अशिक्षितता, गरिबी, धर्मांधता यांचा गैरफायदा उठवून थोड्याशा पैशांच्या आमिषाने तरुणांना पडघ्यात आणून दहशतवादी कारवायांचे प्रशिक्षण देण्याचा हेतू एनआयएच्या कारवाईतून स्पष्ट दिसतो. माथी भडकवलेल्या तरुण, तरुणींचा वापर ठाणे जिल्ह्यातील गर्दीच्या शहरांत घातपाती कारवायांकरिता करण्याचा हेतू असू शकतो. पडघ्यातील योजनेला एनआयएने सुरुंग लावला. परंतु देशात मुस्लीमबहुल अन्य गावांत कदाचित अशीच प्रशिक्षण योजना राबवली जात असू शकते. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांची व नागरिकांची खबरदारी हेच असे हल्ले रोखण्याचा उपाय असू शकतात.
देशात जेव्हा दहशतवादी हल्ले होत होते, तेव्हा सरसकट साऱ्या समाजाला संशयाच्या नजरेने पाहण्याची वृत्तीदेखील वाढली होती. तशी चूक पुन्हा करणे टाळायला हवे. सर्वच जाती, धर्मांत चांगले व वाईट लोक असतात. मोजक्या वाईट प्रवृत्तीच्या लोकांमुळे देशप्रेमी व्यक्तींकडे सतत संशयाने पाहिले, त्यांना शिक्षण, करिअर, सन्मानाने जगण्याच्या संधी नाकारल्या तर ज्यांना माणसांची मने कलुषित करून घातपात करणारे अधिकाधिक हात हवे आहेत त्यांना अप्रत्यक्ष मदत करण्यासारखे होते. यातून द्वेषमूलक प्रवृत्तीच बळकट होतात.

Web Title: If there is a riot like that in Thane, Dembivli...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.