सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2025 00:07 IST2025-08-25T00:07:34+5:302025-08-25T00:07:55+5:30
निक्की भाटी हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. त्यांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
निक्की भाटी हत्याकांडामुळे संपूर्ण देश हादरला आहे. 'या नराधमांना फाशी द्या' किंवा 'त्यांनाही जिवंत जाळून टाका,' अशी एकच मागणी सर्वांकडून केली जात आहे. निक्कीच्या कुटुंबीयांना आशा आहे की, त्यांच्या मुलीला न्याय मिळेल. निक्कीचे वडील भिखारी सिंह यांनी, "अशा लोकांच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे. जावई आणि मुलीच्या सासरच्या मंडळींना कठोर शिक्षा व्हावी, हीच आमची मागणी आहे," असे म्हटले. माध्यमांशी साधलेल्या संवादात त्यांनी काही धक्कादायक खुलासे केले आहेत.
पंचायतीच्या निर्णयामुळे मुलीला परत सासरी पाठवले!
निक्कीच्या वडिलांना विचारण्यात आले की, 'जर निक्कीला वारंवार हुंड्यासाठी त्रास दिला जात होता, तर तुम्ही तिला परत घरी का आणले नाही?' यावर त्यांनी सांगितले की, "आमच्या समाजात पंचायत बसते आणि तीच काय करायचे ते ठरवते. जेव्हा मला कळले की, निक्कीला त्रास दिला जात आहे, तेव्हा मी तिला घरी आणले होते. तेव्हा येथे पंचायत बसली. जावई विपिन भाटी आणि त्याच्या कुटुंबालाही बोलावले गेले. त्यांनी निक्कीला यापुढे त्रास देणार नाही, असे आश्वासन दिले. त्यावर पंचायतीने निक्कीला परत सासरी पाठवण्याचा निर्णय दिला. पण त्यानंतरही जावई आणि मुलीच्या सासूने माझ्या मुलीचा छळ सुरूच ठेवला."
त्यांच्यावर बुलडोझर चालवा!
निक्कीच्या वडिलांनी पुढे सांगितले की, "आम्ही मुलींना खूप लाडाने वाढवले होते. त्या आमच्यावर कधीच ओझं नव्हत्या. आम्ही दोन्ही मुलींना डीपीएस शाळेत शिकवले. थाटामाटात त्यांचे लग्न केले. सासरच्या लोकांच्या प्रत्येक मागणीची पूर्तता केली. निक्की स्वतः चांगली कमाई करत होती. तिने ब्युटिशियनचा कोर्स केला होता आणि महिन्याला एक लाख रुपये कमवत होती. पण तो पैसाही विपिन ठेवून घ्यायचा, कारण तो स्वतः काहीच काम करत नव्हता. त्याचे काम फक्त फिरणे आणि मुली पटवणे हेच होते."
"योगीजी नेहमी 'बेटी बचाओ, बेटी पढ़ाओ' असे म्हणतात. आता जेव्हा मुलींसोबत असे घडत आहे, तेव्हा विपिनसारख्या लोकांच्या घरावर बुलडोझर चालला पाहिजे. त्यांना फाशी दिली गेली पाहिजे. विपिनच्या गर्लफ्रेंड्सशी आम्हाला काही घेणेदेणे नाही, फक्त विपिन आणि त्याच्या कुटुंबाला शिक्षा व्हावी," अशी मागणी त्यांनी केली.
"प्रत्येक वडिलांचे कर्तव्य असते की मुलीला चांगले शिक्षण द्यावे. आम्ही ते कर्तव्य पूर्ण केले. लग्नानंतर मुलगी सासरच्यांची जबाबदारी असते. त्यांनी तिला मुलीसारखेच वागवायला हवे. पण माझ्या मुलीला तर या नराधमांनी हुंड्यासाठी मारून टाकले," असे म्हणताना निक्कीच्या वडिलांच्या डोळ्यांत अश्रू होते.