"मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावलीय"; पूजाचा एक्स बॉयफ्रेंडला कॉल, मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2023 14:50 IST2023-08-16T14:50:22+5:302023-08-16T14:50:55+5:30
११ वर्षीय दिव्यांशची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. आरोपी पुजाने हत्येनंतर त्याचा मृतदेह घरातच बेडखाली लपवून ठेवला होता

"मी तुझी सर्वात मौल्यवान वस्तू हिसकावलीय"; पूजाचा एक्स बॉयफ्रेंडला कॉल, मग...
नवी दिल्ली – शहरातील इंद्रपुरी भागात ११ वर्षीय दिव्यांश उर्फ बिट्टू मर्डर केसमध्ये नवीन खुलासा झाला आहे. गुन्हेगार पूजानं दिव्यांशचे वडील म्हणजे तिचा एक्स बॉयफ्रेंड जितेंद्रला कॉल करून मी तुझी सर्वात आवडती गोष्ट हिसकावलीय असं म्हटलं. जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमेरे, ३ दिवसाच्या कठोर मेहनतीनंतर ११ वर्षीय दिव्यांशच्या मारेकरी पूजाला बेड्या घातल्या आहेत.
११ वर्षीय दिव्यांशची हत्या गळा दाबून करण्यात आली होती. आरोपी पुजाने हत्येनंतर त्याचा मृतदेह घरातच बेडखाली लपवून ठेवला होता. तपासावेळी पूजाने पोलिसांना सांगितले की, माझा प्रियकर जितेंद्र यानं विश्वासघात केल्यानं मी रागाच्या भरात दिव्यांशची हत्या केली. दिव्यांशचे वडील जितेंद्र २०१९ पासून लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होते. जितेंद्रने त्याच्या पत्नीला घटस्फोट देत पूजाशी लग्न करण्याचं वचन दिलं होते. परंतु २०२२ मध्ये जितेंद्र पूजाला सोडून पुन्हा त्याची बायको आणि मुलगा यांच्यासोबत राहू लागला.
जितेंद्रने पूजाला सोडल्याने ती नाराज झाली होती. कुठल्याही परिस्थितीत जितेंद्रला धडा शिकवायचा असा चंग तिने बांधला. दिव्यांशमुळे जितेंद्रने पूजाशी लग्न करायला नकार दिला असं तिला वाटायचे. त्यामुळे जितेंद्र आणि तिच्यातील अडचण असलेला दिव्यांशला वाटेतून बाजूला करायचे असं तिने ठरवले. पूजा १० ऑगस्टला एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून जितेंद्रच्या घरी पोहचली तेव्हा घरचा दरवाजा उघडाच होता. दिव्यांश त्याच्या बेडवर झोपला होता. घरात कुणीच नव्हते. ही संधी साधत पूजाने दिव्यांशची गळा दाबून हत्या केली आणि त्याचा मृतदेह बेडखाली लपवला.
या घटनेची माहिती पोलिसांना कळताच त्यांनी तपासाला सुरुवात केली. पोलिसांनी जवळपास ३०० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. फुटेजच्या मदतीने पोलिसांनी पूजाची ओळख पटली. पूजाला ट्रेस केले असता ती नजफगड-नागलोई रोडवरील सर्व फुटेजमध्ये दिसली. त्यानंतर ३ दिवसांनी पूजाला बक्करवाला परिसरातून ताब्यात घेण्यात आले. अटकेनंतर खाकी वर्दीचा धाक दाखवताच आरोपी पूजाने दिव्यांशची हत्या केल्याचे कबुल केले.