'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 11:16 IST2025-11-04T11:06:23+5:302025-11-04T11:16:27+5:30
बंगळुरुतील डॉक्टर हत्या प्रकरणात पतीच्या मेसेजमुळे नवा खुलासा झाला आहे.

'तुझ्यासाठी बायकोला संपवलं'; दुसऱ्या लग्नासाठी डॉक्टरने केली पत्नीची हत्या; मेसेजमुळे 'डबल गेम'चा पर्दाफाश
Bengaluru Doctor Death: बंगळुरीत एका डॉक्टर पतीने आपल्या पत्नीच्या हत्येमागे दडलेले क्रूर सत्य केवळ एका मेसेजने उघड झाले आहे. त्वचाविकारतज्ज्ञ असलेल्या पत्नी डॉ. कृतिका एम रेड्डीच्या खुनाच्या आरोपाखाली डॉ. महेंद्र रेड्डी याने याला अटक झाली होती. पत्नीच्या मृत्यूनंतर काही महिन्यांत डॉ. महेंद्र रेड्डी याने सुमारे अर्धा डझन महिलांशी संपर्क साधला होता आणि त्यांच्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता. पोलिसांनी सांगितले की रेड्डी यांनी एका महिलेसमोर कबूल केले की त्याने त्याच्या पत्नीची हत्या केली आहे. आरोपीने पत्नीच्या मृत्यूनंतर ४ ते ५ महिलांना 'मी तुझ्यासाठी बायकोला मारले'असा धक्कादायक मेसेज पाठवला होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. महेंद्र रेड्डी याने २९ वर्षीय पत्नी डॉ. कृतिका रेड्डी हिला २४ एप्रिल रोजी भूल देऊन तिची हत्या केली. महेंद्रला १४ ऑक्टोबर रोजी उडुपी येथील मणिपालमधून अटक करण्यात आली. महेंद्रने खुनाची कबुली देणारा हा मेसेज एका वैद्यकीय क्षेत्रातील महिलेला डिजिटल पेमेंट ॲप 'फोनपे' द्वारे पाठवला होता. या महिलेने महेंद्रला इतर सर्व मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर ब्लॉक केले होते. पोलीस उपायुक्त के. परशुरामा यांनी फोनपेद्वारे मेसेज पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.
ज्या महिलेला हा मेसेज मिळाला, तिने पोलिसांना सांगितले की तिने महेंद्रचे लग्न होण्यापूर्वीच त्याला ब्लॉक केले होते. कृतिकाशी लग्न झाल्यावर ती त्याच्यापासून दूर गेली होती. मात्र, पत्नीच्या खुनानंतर दोन महिन्यांनी महेंद्रने तिला पत्नीला संपवल्याचा मेसेज पाठवला. खुनाच्या आरोपाखाली अटक होईपर्यंत त्या महिलेला वाटले होते की महेंद्रने फक्त तिच्याशी बोलण्यासाठी असा खोटा मेसेज पाठवला होता. पोलिसांनी सांगितले की या महिलेचा गुन्ह्यात कोणताही सहभाग नाही.
डॉ. महेंद्र रेड्डीचे आयुष्य अत्यंत नाट्यमय आणि गुंतागुंतीचे होते. तपास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, महेंद्र २००९-२०२३ या काळात मुंबईतील एका महिलेच्या संपर्कात होता. त्याने तिला लग्नाची मागणी घातली आणि काही भेटीगाठीही झाल्या. त्यानंतर त्याने एक भयानक नाटक रचले. त्याने आपल्या वडिलांना फोन करायला लावून त्या महिलेला कळवले की महेंद्रचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यानंतर त्याने त्या महिलेशी संपर्क तोडला.
मात्र, सप्टेंबर २०२३ मध्ये महेंद्रने पुन्हा फोन करून आपण जिवंत असल्याचे सांगितले. त्याने त्या महिलेला सांगितले की, आपले प्रेम खरे असल्यामुळे मी खोटे बोलून कृतिकाशी लग्न केले. पण, माझ्या कुंडलीनुसार पहिली पत्नी मरणार असल्याने मी लग्न केले. आता कृतिकाचा मृत्यू झाल्यामुळे, त्याला पुन्हा त्या मुंबईच्या महिलेशी लग्न करायचे होते.
पोलिसांनी महेंद्रचा मोबाईल आणि लॅपटॉप जप्त केला असून पुढील तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला आहे. दुसरे लग्न करण्यासाठी त्याने आपल्या डॉक्टर पत्नीला संपवले, अशी माहिती तपासातून समोर येत आहे.