रागाच्या भरात माणूस किती थराला जाऊ शकतो, याचा एक अंगावर शहारे आणणारा प्रकार छत्तीसगडच्या सरगुजा जिल्ह्यातून समोर आला आहे. दारू पिण्यावरून वडिलांनी दिलेल्या साध्याशा दटावणीचा राग मनात धरून एका २५ वर्षीय नराधम मुलाने आपल्या जन्मदात्याची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. धक्कादायक म्हणजे, वडिलांचा मृतदेह पाण्याच्या टाकीत फेकून दिल्यानंतर या नराधमाने बाहेर जाऊन बिर्याणी खाल्ली आणि घरी येऊन शांतपणे झोपून गेला. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, ५० वर्षीय पारस केरकेट्टा हे सरगुजा जिल्ह्यात एकटेच राहत होते. त्यांचा २५ वर्षांचा मुलगा प्रभात केरकेट्टा उर्फ लेडा हा जवळच एका भाड्याच्या खोलीत राहत होता. प्रभातला दारूचे प्रचंड व्यसन होते आणि याच कारणावरून बाप-लेकांमध्ये वारंवार खटके उडत असत. सोमवारी रात्री प्रभात पुन्हा एकदा दारूच्या नशेत धुंद होऊन वडिलांच्या घरी पोहोचला.
साधी दटावणी अन् कुऱ्हाडीचा घाव
नशेत असलेल्या प्रभातला पाहून वडील पारस यांचा संयम सुटला आणि त्यांनी त्याला दारू सोडण्यावरून जोरात ओरडले. या साध्याशा दटावणीमुळे प्रभातचा राग अनावर झाला. त्याने घरात पडलेली कुऱ्हाड उचलली आणि वडिलांच्या डोक्यावर एकामागून एक वार केले. या भीषण हल्ल्यात पारस यांचा जागीच मृत्यू झाला.
पाण्याच्या टाकीत मृतदेह अन् बिर्याणीवर ताव
हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी प्रभातने वडिलांचा मृतदेह उचलून घराच्या पाण्याच्या टाकीत फेकून दिला. मात्र, या क्रूर कृत्यानंतरही त्याच्या चेहऱ्यावर लवलेशही पश्चात्ताप नव्हता. वडिलांचा खून केल्यानंतर तो थेट जवळच्या दुकानात गेला, तिथे त्याने पोटभर बिर्याणी खाल्ली आणि घरी येऊन शांतपणे झोपला.
असा उघड झाला गुन्हा
मंगळवारी सकाळी पारस केरकेट्टा घराबाहेर न दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला. त्यांनी पोलिसांना पाचारण केले. पोलिसांनी घरात जाऊन तपास केला असता पाण्याच्या टाकीत पारस यांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. पोलिसांनी संशयावरून मुलगा प्रभातला ताब्यात घेऊन खाक्या दाखवताच त्याने आपला गुन्हा कबूल केला. "माझ्याकडून चूक झाली," असा दावा त्याने पोलिसांकडे केला असला, तरी त्याच्या क्रूर वागण्याने पोलीसही अवाक झाले आहेत.
सध्या पोलिसांनी आरोपी प्रभातला अटक केली असून, त्याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दारूच्या एका व्यसनापायी एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.
Web Summary : In Chhattisgarh, a 25-year-old man murdered his father for scolding him about drinking. He then dumped the body in a water tank, ate biryani, and slept. Police arrested him after neighbors reported the father missing.
Web Summary : छत्तीसगढ़ में, एक 25 वर्षीय व्यक्ति ने शराब पीने के लिए डांटने पर अपने पिता की हत्या कर दी। फिर उसने शव को पानी की टंकी में फेंक दिया, बिरयानी खाई, और सो गया। पड़ोसियों द्वारा पिता के लापता होने की सूचना देने के बाद पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया।