पत्नीला पेट्रोल ओतून जाळले, वाचवायला आलेल्या मुलीलाही निर्दयी बापाने आगीत ढकलले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 14:40 IST2025-12-26T14:39:39+5:302025-12-26T14:40:08+5:30
Hyderabad Crime: या घटनेनंतर आरोपी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

पत्नीला पेट्रोल ओतून जाळले, वाचवायला आलेल्या मुलीलाही निर्दयी बापाने आगीत ढकलले...
Hyderabad Crime: तेलंगणाची राजधानी हैदराबाद येथील नल्लकुंटा परिसरात घरगुती हिंसाचाराची अंगावर शहारे आणणारी घटना समोर आला आहे. संशयाच्या भरात व्यक्तीने आपल्या पत्नीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पतीचे नाव वेंकटेश असून, तो पत्नी त्रिवेणीवर सातत्याने संशय घेत होता. याच कारणावरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत. अलीकडे हा वाद टोकाला गेला आणि संतापाच्या भरात वेंकटेशने त्रिवेणीवर पेट्रोल ओतून तिला आग लावली.
मुलांसमोरच घडली अमानुष घटना
या घटनेचा सर्वात धक्कादायक पैलू म्हणजे, ही घटना घरात त्यांच्या लहान मुलांच्या समोर घडली. त्रिवेणी आगीत होरपळत असताना तिच्या मुलीने धाडस दाखवत आईला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने निर्दयपणे मुलीलाही ढकलून आगीच्या झळा बसतील अशा स्थितीत टाकले. या अमानुष घटनेनंतर वेंकटेश घटनास्थळावरून फरार झाला. त्रिवेणीचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी कशीबशी घराबाहेर पडली.
प्रेमविवाहानंतर वाढला छळ
पोलिसांच्या तपासात समोर आले आहे की, वेंकटेश आणि त्रिवेणी यांचा प्रेमविवाह झाला होता. मात्र लग्नानंतर वेंकटेशचा संशय अधिकच वाढत गेला आणि तो त्रिवेणीचा मानसिक व शारीरिक छळ करू लागला. या त्रासाला कंटाळून त्रिवेणी काही काळ माहेरी गेली होती. नंतर परतल्यानंतरच ही दुर्दैवी घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून, फरार आरोपीच्या शोधासाठी छापेमारी सुरू आहे. लवकरच आरोपीला अटक करण्यात येईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.